Pakistan Reaction On BJP Win: “आता भारत-पाकिस्तान युद्ध कोणीही थांबवू शकत नाही..” प. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया

इस्लामाबाद/कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) मिळवलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाची चर्चा आता जगभरात सुरू झाली आहे. १५ वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकत भाजपने तब्बल २०६ जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भारताच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निकालामुळे शेजारील देश पाकिस्तान पुरता हादरला असून, तिथल्या राजकीय तज्ज्ञांनी थेट युद्धाचा उल्लेख करत भारताला चिथावणीखोर इशारा देण्यास सुरुवात केली आहे.

“आता भारत-पाकिस्तान युद्ध कोणीही थांबवू शकत नाही”

पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर पाकिस्तानी संरक्षण विश्लेषक कमर चीमा यांनी अत्यंत प्रक्षोभक विधान केले आहे. चीमा यांनी दावा केला की, “आता भारताचा संपूर्ण नकाशा भगवा झाला असून नरेंद्र मोदींचा प्रचार पुन्हा एकदा जिंकला आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप आता भारताच्या ७२ टक्के भूभागावर आणि ७८ टक्के लोकसंख्येवर थेट नियंत्रण ठेवतात. याचा सरळ अर्थ असा की, आता भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध कोणीही थांबवू शकत नाही.”

युद्ध, राष्ट्रवाद आणि धर्म हीच भाजपची मुख्य ताकद असल्याचा जावईशोध लावत चीमा पुढे म्हणाले, “भाजपने स्वतःला अधिक मजबूत केले आहे. पाकिस्तानने आता हे समजून घेतले पाहिजे की, भारतासोबतचे आपले युद्ध जिथे संपले होते, तिथूनच ते पुन्हा सुरू होईल.”


‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पराभवाचा केला उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आता एका ‘लाटेत’ बदलली आहे, असे म्हणत कमर चीमा यांनी पाकिस्तानच्या हतबलतेवरही भाष्य केले. ते म्हणाले, “‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव झाल्याचा दावा केला गेला. यानंतर आता पाकिस्तानला कळून चुकले आहे की, ते पंतप्रधान मोदींना हवे ते करू देऊ शकत नाहीत. मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान नरेंद्र मोदींना कडवी झुंज देईल.”

“मोदींनी अशी जादू केली की ममता बॅनर्जी एकाकी पडल्या”

दुसरीकडे, पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार अर्झू काझमी यांनीही पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर आणि भाजपच्या विजयावर एक विशेष व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताच्या बदलत्या राजकीय चित्रावर आश्चर्य व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत अशी काही जादू केली की, गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने एकतर्फी जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी या निवडणुकीत पूर्णपणे एकाकी पडल्या आणि त्यांचा बालेकिल्ला ढासळला.”

पश्चिम बंगालच्या या निकालांनी भारताच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली असतानाच, भारताच्या अंतर्गत निवडणुकीच्या निकालांमुळे पाकिस्तानच्या गोटात निर्माण झालेली भीती आणि युद्धाची भाषा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:00 05-05-2026