नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) बँक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मे ते जुलै २०२६ या आगामी तिमाहीसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ०.७० टक्क्यांची वाढ मंजूर करण्यात आली आहे. या वाढीनंतर बँक कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता २५ टक्क्यांवरून वाढून २५.७० टक्के होणार आहे. मात्र, ही वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने बँक कर्मचारी आणि कामगार संघटनांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.
पगारात नेमकी किती वाढ होणार?
महागाई भत्त्यात ०.७० टक्क्यांची वाढ झाल्यामुळे विविध वेतनश्रेणीत असणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात ४३५ रुपयांपासून ते १,०५० रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (Basic Pay) ४८,००० रुपयांपासून ते १,१७,००० रुपयांच्या दरम्यान आहे, त्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळेल.
तुमच्या मूळ वेतनानुसार असे असेल वाढीचे गणित:
- स्टेज १ (मूळ वेतन ₹४८,४८०): महागाई भत्त्यात ₹४३५ ची वाढ होईल.
- स्टेज १० (मूळ वेतन ₹६७,१६०): महागाई भत्त्यात ₹६०१ ची वाढ होईल.
- स्टेज २० (मूळ वेतन ₹९३,९६०): महागाई भत्त्यात ₹८३८ ची वाढ होईल.
- स्टेज २५ (मूळ वेतन ₹१,०८,२६०): मासिक पगार ₹९६५ ने वाढेल.
महागाई भत्ता कशाच्या आधारे ठरवला जातो?
इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) २ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, हा महागाई भत्ता मार्च २०२६ ला संपलेल्या तिमाहीतील औद्योगिक कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय सरासरी ग्राहक मूल्य सूचकांकावर (AIACPI-IW) आधारित आहे. हा निर्देशांक देशातील महागाईचा कल लक्षात घेऊन भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचा बेंचमार्क मानला जातो.
२०२६ च्या पहिल्या तिमाहीतील CPI आकडेवारी
चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतील ग्राहक मूल्य सूचकांक (CPI) खालीलप्रमाणे नोंदवला गेला:
- जानेवारी २०२६: १४८.६
- फेब्रुवारी २०२६: १४८.५ (किंचित घसरण)
- मार्च २०२६: १४९.१ (वाढ)
या तीन महिन्यांचा सरासरी सीपीआय १४८.७३ इतका राहिला. २०१६ मधील पायाभूत वर्षाच्या (Base Year) तुलनेत सध्याचा फरक २५.७० इतका आल्यामुळे आगामी मे ते जुलै २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ०.७० टक्के इतकी वाढ निश्चित करण्यात आली आहे. जरी ही वाढ अल्प असली, तरी ती सध्याच्या महागाईच्या ट्रेंडशी सुसंगत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:30 05-05-2026














