‘लाडकी बहिणीं’ची प्रलंबित प्रकरणे ७२ तासांत मार्गी लावा : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना सक्षम करणारी आहे. ७२ तासांत प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत. पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला हवेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.

पालकमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत सोमेश्वर, टिकेगाव, चांदराई आणि हरचिरी या गावातील कुटुंबाना भेट दिली. यावेळी राहुल पंडित, बाबू म्हाप, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी ज्या महिलांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, त्या प्रकरणांबाबत संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या गावभेट कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ महिला भगिनींना व्यवस्थित मिळतो की नाही, हे पाहण्यासाठी मी आज आलोय. ही योजना सर्व जात, धर्माला घेऊन जाणारी, आर्थिक ताकद देणारी आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही. उलट भविष्यात पंधराशेमध्ये वाढच होईल. तुमच्या चेहऱ्यावरील झालेला आनंद पाहून, आज मला खूप समाधान वाटले.

५४ हजार महिलांना लखपती बनवायचेय
लखपती दीदी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५४ हजार महिलांना लखपती बनवायचे आहे. या योजनेसह लेक लाडकी, तीर्थ दर्शन, वयोश्री या योजनांचा लाभही सर्वांनी घ्यावा. महिला भगिनिच्या चेहऱ्यावरील हास्य हेच आमचे समाधान आहे. या योजनेत एकही पात्र महिला वंचित राहणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रे पूर्ण करून घ्यावीत. त्रुटी दूर कराव्यात, असेही पालकमंत्री म्हणाले.

माझ्यावर उपचार सुरु आहे. त्यासाठी महिन्याला औषधे घ्यावी लागतात. हे सरकार जनसामान्यांचे आहे. आम्हा बहिणीसाठीच्या या योजनेमुळे आता गरिब बहिणीची चांगली सोय झाली आहे. -सरिता भितळे गृहिणी, सोमेश्वर.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 26/Sep/2024