Ratnagiri : विधानसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत कामांची लगबग

रत्नागिरी : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषदेतील विविध विभागात लगीनघाई सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्वच विभागांत कामांची लगबग सुरू असून अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने शासकीय कार्यालयामध्ये धावपळ सुरु आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेतही निधी खर्चासाठी सर्व विभागांमध्ये लगबग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी निर्णयांना ब्रेक लागणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या विविध विभागात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे.

येत्या काही दिवसात आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे विविध विभागातील कर्मचारी शासकीय सुट्टीदिवशी, कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त काम करत आहेत. विविध कामांना प्रशासकीय मान्यता, वैयक्तीक लाभाच्या योजनांना मंजुरी, विकासकामांना मंजुरी, आस्थापनाविषयक कामकाज या कामांची लगीनघाई सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम प्राथमिक शिक्षण, आरोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभागात अधिकारी व कर्मचार्‍यांची धावपळ सुरु आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सामान्य प्रशासन विभागाकडे असल्याने बांधकामच्या कामवाटप समितीची बैठक वेळेत न झाल्याने कामाच्या शिफारसी मिळावयास विलंब होत आहे. त्यामुळे ही आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुसतीच कामे मंजूर झाली असली तरी भूमिपूजन व उद्घाटने पदाधिकार्‍यांना करता येणार नाही. चालूवर्षी सर्वच विभागातील कर्मचारी पदोन्नतीच्या नस्त्या संबंधित विभागाकडे प्रलंबित पडल्यामुळे आचारसंहिता लागली तर कोणत्याही विभागातील पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 26-09-2024