माणगाव खुनातील संशयित रत्नागिरीत ?

रत्नागिरी : येथील रेल्वेस्टेशनला उतरून जंगलाच्या दिशेने दोन तरुणानी पलायन केले. मिरजोळे खेडशीच्या स्थानिकांनी पळणाऱ्या या तरुणांना पाहिले; मात्र ते चोरटे होते की आणखी कोणी याबाबच तर्क सुरू झाले आहेत. माणगावातील खून प्रकरणातील संशयित रत्नागिरीत आले का? याचा तपास पोलिस करत आहेत. पलायन केलेल्या तरुणांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यावरून रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसर आणि अन्यत्र त्या दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव रेल्वेस्टेशन येथे तीन तरुणांमध्ये वाद होऊन एकाचा निघृण खून झाला. या घटनेने रायगड हादरलं होतं. ही घटना ११ सप्टेंबरला रात्री रेल्वेस्टेशननजीक दुकानाच्या शेडमध्ये तीन तरुणांमध्ये वाद त्यानंतर मारामारी झाली. या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता; परंतु त्याला उपचारासाठी नेण्याऐवजी तशाच अवस्थेत सोडून संशयित पसार झाले होते. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. दोन अनोळखीवर माणगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर यंत्रणेकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणीमध्ये मंगळवारी (ता. २४) दोघे संशयित येथील स्थानकावर उतरल्याचे कैद झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 27/Sep/2024