रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. कोकण रेल्वेवर दुहेरीकरण करण्याची चर्चा होत होती. कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरील प्रवासी संख्या, रेल्वे गाड्या आणि स्थानकाची संख्या वाढली. मात्र कोकण रेल्वेचे दुहेरीकरण प्रलंबित असल्याने, कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जाते. तसेच नुकताच कर्नाटक राज्यातील काही खासदार एकत्र येऊन त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, या विषयाबाबत चर्चा केली. परंतु अद्याप ठोस निर्णय झाला नाही. तर दुसरीकडे कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी नुकताच माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नातून धक्कादायक उत्तरे मिळाली आहेत. अक्षय महापदी यांनी 12 नोव्हेंबर 2024 कोकण रेल्वेचे दुहेरीकरणाबाबत माहिती विचारली. त्यानुसार दुहेरीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. फक्त कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात रोहा ते वीर 46.8 किमीपर्यंत रेल्वे मार्गाचे ऑगस्ट 2021 रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. तर, अन्य भागात टप्पा दुहेरीकरण किंवा पूर्ण दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, असे दोन वेळा रेल्वेकडून स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 13/Dec/2024














