दापोली : भारतातील बहुसंख्य जनता ग्रामीण भागात कृषी व्यवसायात आहे. त्यांच्या खूप समस्या आहेत म्हणून स्वयंसेवकांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. स्वयंपूर्ण खेडी भारतात आहेत म्हणून खेड्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्वयंसेवकांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी केले.
येथील न. का. वराडकर कला आणि रा. वि. बेलोसे वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एन. एस. एस. दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. यांनी स्वच्छता, आरोग्य, संस्कार, चोवीस तास सामाजिक सेवेत तत्पर, श्रमप्रतिष्ठा, नेतृत्व गुण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, स्वयंशिस्त, उज्ज्वल भविष्यकाळ यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
विशेष अतिथी म्हणून वरिष्ठ महाविद्यालय एनएसएस विभागप्रमुख प्रा. डॉ. जयश्री गव्हाणे उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, स्वयंसेवकांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करावा. स्वयंशिस्त व श्रमाची तयारी या गुणांमुळेच उज्ज्वल भविष्य घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक एफ. के. मगदूम यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. एन. एस. एस. प्रकल्पाधिकारी बी. बी. ढवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर मानसी कोवळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 28/Sep/2024