रामपूर ते चिपळूण रस्ते भूसंपादनाला सुरुवात; २५० जणांना नोटीस

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गातील रखडलेल्या रामपूर ते चिपळूण शहरातील उक्ताडपर्यंतच्या गावांतील भूसंपादनला शुक्रवारी शिरळ येथून सुरुवात झाली. भूमिअभिलेख खात्यासह राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, संबंधित शेतकरी यांच्या उपस्थितीत मोजणी केली जात आहे. येत्या २४ रोजी कोंढे गावात मोजणी होणार आहे.

चिपळूण-गुहागर महामार्गातील पहिला टप्पा पूर्णत्वास गेल्यानंतर रामपूर ते उक्ताड या उर्वरित दुसरा टप्पा जागेच्या मोजणीमुळे गेले वर्षभरापासून रखडला आहे. सुमारे १४ कि.मी.च्या या मार्गासाठी ७१ कोटी रूपये खर्चाची निविदा राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने काढून वर्षभरापूव ठेकेदारही नियुक्त झाला; मात्र भूसंपादनाचे काम अर्धवट राहिले असल्याने कामाला सुरूवात झालेली नाही. अशातच आता भूमिअभिलेख विभागाकडून कोंढे, शिरळसह सहा गावांतील सुमारे अडीचशेहून अधिक शेतकऱ्यांना नोटीस दिली आहे.

शुक्रवारी शिरळ येथून मोजणीला सुरूवात झाली. सध्या सात मीटर रुंदीचा रस्ता असून पुढे तो दहा मीटर काँक्रीटचा होणार आहे. त्यासाठी सुमारे २२ मीटर तर वळणावर २४ मीटरपर्यंतची जागा संपादीत केली जाणार आहे. शुक्रवारी शिरळ येथील मोजणी झाल्यानंतर २४ डिसेंबर रोजी कोंढे व त्यानंतर रेहेळ वैजी, पाचाड, मालघरसह रामपूर या गावातील मोजणी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 23-12-2024