Ratnagiri: भोके येथे घरात आकडी येऊन पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद; आंबेकरवाडीतील घटनेमुळे हळहळ

रत्नागिरी:

Bhoke Youngman Death | रत्नागिरी तालुक्यातील भोके-आंबेकरवाडी येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा आकडी (फिट) येऊन घरात पडल्याने झालेल्या गंभीर दुखापतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना ३० जून रोजी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. प्रमोद पांडुरंग आंबेकर (वय ३५, रा. भोके-आंबेकरवाडी, ता. रत्नागिरी) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत त्याचा भाऊ प्रवीण आंबेकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

घरात पडलेल्या अवस्थेत आढळला; डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद आंबेकर याला दारूचे व्यसन होते, तसेच त्याला अधूनमधून आकडी येण्याचा त्रासही होता. मंगळवारी सकाळी तो घरात अचानक पडलेल्या अवस्थेत आढळून आला. आकडी येऊन जमिनीवर कोसळल्यामुळे त्याच्या डोक्याला, तोंडाला आणि गालाला गंभीर दुखापत झाली होती. शरीरातून रक्तस्त्राव झाल्यामुळे आणि मार लागल्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती.

शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली

प्रमोद घरात जखमी अवस्थेत सापडल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने धावपळ करत त्याला उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले होते, मात्र उपचाराला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 03-07-2026