राजापूर : राजापूर आगारातून भू-पेंडखळे-भालावली या मार्गावर वस्तीच्या बस फेऱ्या पाठविल्या जात होत्या. मात्र, गेले दोन महिने या फेऱ्यांमधील एक वस्तीची फेरी कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याने रोज सकाळच्या सत्रात सुमारे पंधरा ते वौस विद्यार्थी बसमध्ये प्रवेश मिळू न शकल्याने शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत.
यामध्ये दररोज सुमारे १३५ पासधारक विद्यार्थी तसेच जोडीला रोजचे प्रवासी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा नसल्यामुळे स्टॉपवरून परत घराकडे जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राजापूर आगाराच्या परस्पर मनमानी कारभारामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता नेहमीच्या बसेस रद्द केल्यामुळे थांब्यावर विद्यार्थी व प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अनेक गावातील वस्तीच्या फेऱ्या अचानक रद्द करण्याचे प्रमाण वाढले असून, त्याचा मनस्ताप आणि नुकसान सर्वसामान्य प्रवासी वर्गाला सोसावे लागत आहे. गेले दोन महिने भू- पेंडखळे-भालावली या मार्गावरील या फेऱ्यांमधील एक वस्तीची फेरी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी अवघी एक बस आल्यामुळे जास्त प्रमाणात गर्दीचे प्रमाण वाढले. प्रवाशांनी खच्चून भरलेला गाडीतून प्रवास होत असल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्याबाबत प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 24/Dec/2024












