कडवई : संगमेश्वर तालुक्यातील शिंदे आंबेरी गावची सुकन्या तेजल शिंदे हिची अमरावती येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्यावर तिचे नुकतेच गावाला आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली.
तेजलचे प्राथमिक शिक्षण शिंदे आंबेरी येथील प्राथमिक शाळेत झाले. दुसरीत असताना पित्याचे छत्र हरपले. इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई येथे झाले. २०११ साली दहावीत असतानाच अचानक आईने जगाचा निरोप घेतला. तरीही त्याचा आपल्या अभ्यासावर परिणाम न होऊ देता तिने शाळेत तिसरा क्रमांक पटकावला.
पुढील शिक्षण तिने सावर्डे येथील सह्याद्री महाविद्यालय येथे पूर्ण केले. तिने इंग्लिश लिटरेचर मध्ये बी.ए. पूर्ण केले. २०१७ पासून तिने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.
तेजलने २०१८ साली पीएसआय ची पूर्वपरीक्षा दिली. २०१९ ला पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली. २०२० ला मुख्य परीक्षा व मुलाखत झाली. तेजल शिंदे हिच्या यशाबद्दल तिची शिंदे आंबेरी ते कडवई अशी मिरवणूक काढण्यात आली.
भाईशा घोसाळकर हायस्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यळगुडकर, सचिव वसंत उजगावकर, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, पर्यवेक्षक संतोष साळुंके, मंगेश कदम यांनी तिचा यथोचित सन्मान केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 24/Dec/2024












