रत्नागिरी : येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन बुधवारी, दि. २५ डिसेंबर सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
फेब्रुवारी २४ मध्ये ३० वर्षांसाठी शासनाने जागा लीजवर दिली आणि नवीन वास्तूचा मार्ग प्रशस्त झाला.
पालिकेने प्लॅन मंजुरी दिली आणि जुनी इमारत पाडण्यात आली. ग्रंथालयातील १ लाख १५ हजारांची ग्रंथसंपदा संरक्षित पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात झाडगाव येथील सदाचार भवन परिसरात हलविण्यात आली असून तेथे वाचनालयाचे कामकाज सुरू आहे.
रत्नागिरीतील १९७ वर्षाचे हे वाचनालय नव्या अद्ययावत स्वरूपात उभे करण्यासाठी वाचनालयाच्या जागेवर ११ हजार ५०० चौरस फुटाचे तीन मजली बांधकाम नियोजित आहे. तळ मजल्यावर पुस्तक मांडणी आणि ग्रंथालय विभाग, पहिल्या मजल्यावर प्रशस्त सभागृह, दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका, मुक्त वाचन विभाग, सांस्कृतिक कक्ष असे विभाग प्रस्तावित आहेत. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३ कोटी ५० लाखांचे अंदाजपत्रक आहे. पुढील ६ महिन्यांत दुमजली स्ट्रक्चर उभे करून दिवाळीपर्यंत तळमजल्यावरील वाचन विभाग अंतर्गत सजावटीसह सज्ज करण्याचा आणि २०२७ जानेवारीपर्यंत म्हणजे द्विशताब्दी महोत्सव प्रारंभ होतानाच पूर्ण वाचनालय इमारत पूर्णांशाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. आज पर्यंत १ कोटीचा निधी उभारला आहे उर्वरित निधी उभारण्यासाठी वाचक, ग्रंथप्रेमी आणि दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी हातभार लावावा, असे आवाहन अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 24-12-2024












