स्थलांतरित तरुण पुन्हा गावाकडे वळवणार : मंत्री योगेश कदम

मंडणगड : दापोली मतदारसंघातून मुंबई-पुण्याकडे वळलेला तरुण कामासाठी पुन्हा आपल्या गावाकडे आणण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी सांगितले. त्यासाठी लवकरच मंडणगडात एमआयडीसी मंजूर करून त्याचे भूमिपूजनही केले जाईल, असे सूतोवाच केले.

मंत्री कदम मंडणगड येथे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी मंत्री कदम म्हणाले, ‘मतदारसंघातील अनेक विकास प्रकल्प प्रलंबित आहेत, ते पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यतत्पर राहणार आहे. उद्योग, जलसंधारण, पर्यटन, आरोग्य तसेच महसूल, ग्रामविकास विभागांची खाती शिवसेनेकडे आहेत. त्या माध्यमातून दुर्लक्षित सेवा परिपूर्ण करण्याच्यादृष्टीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंडणगड तालुक्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासोबत पर्यटनवाढीच्यादृष्टीने विकासात्मक प्रकल्प राबवणार असून, स्थलांतर बनलेला गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. संविधानाने दिलेल्या मंत्रिपदाच्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्रासोबत कोकण आणि मतदारसंघाचा विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन पावले पुढे राहून काम करणार
तरुण मंत्री म्हणून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर देणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित काम दोन पावले पुढे राहून निश्चितच करणार आहे. महाराष्ट्राची सेवा करण्यासोबत शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे, असे मंत्री कदम यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 25/Dec/2024