निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद : पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : आपण अधिकारी असलो तरी सेवानिवृत्त कर्मचारी आहोत त्यामुळे आपण सर्व समान आहोत, अशी भावना ठेवा. आपला गणवेश, पदाची झालर दूर ठेवल्यास आपण सर्वांशी मिळून मिसळून जगू शकतो. आपण प्रथम माणूस आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. निवृत्तीनंतर आपण छंद जोपासा, गप्पा मारा, समाजसेवा, रुग्णसेवा करा, असे आवाहन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

चांगले सहकारी शोधा. संध्याकाळची कंपनी नको. मॉर्निंग वॉक करणारे, लोकांची सेवा करणार भजन, पूजन करणारे समूह शोधा. त्यात सक्रिय राहा. त्यासाठी हा मेळावा आवश्यक आहे. हे सर्व सहकारी चांगले आहेत. संघटन मजबूत करा, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले. मी संघटनेच्या सभासदांना नेहमी भेटत असतो. ही संघटना चांगले काम करत आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या पंचवार्षिक स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतून माजी पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत, सत्कार केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी कार्याध्यक्ष सुखानंद साब्दे, जनसंपर्क अधिकारी श्रीराम गोरे, डॉ. अलिमियाँ परकार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सावंत, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, उपअधीक्षक भागोजी आवटी, नवी मुंबई अध्यक्ष विनोद चव्हाण, मुंबईचे मुख्य सचिव विजय चव्हाण, मुख्य सल्लागार अरविंद सावंत, सिंधुदुर्गचे सचिव गोविंद वारंग, कार्याध्यक्ष अर्जुन राणे, पुणे माजी उपायुक्त राजहंस, सचिव शिरीश सासणे उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष अर्जुन राणे यांनी केले. कार्यक्रमाला मदत करणारे नॅशनल मेडिकल्सचे जैन यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

सुखानंद साब्दे यांनी सेवानिवृत्त पोलिसांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. आयुष्मान कार्ड काढा. आयुर्विमा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तंदुरुस्तीसाठी टीप्स
डॉ. अलिमियाँ परकार यांनी सर्वांना तब्येत तंदुरुस्त राहण्यासाठी काय करायला हवे, त्याच्या टीप्स दिल्या. मी तरुण डॉक्टर असताना मला पोलिस अधीक्षक ए. के. सिंग यांनी पाय गरम, पोट नरम आणि डोकं थंड ठेवा, असा संदेश एका कार्यक्रमात दिला. त्यामुळेच आज मी याही वयात दिवसाचे ८ तास रुग्ण तपासणी करतो, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 25/Dec/2024