पणजी : नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच सोमवारी कळंगुट येथे २० पर्यटकांना समुद्रात जलसफरीसाठी घेऊन गेलेली बोट समुद्रात आलेल्या मोठ्या लाटेमुळे उलटली. यात मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सूर्यकांत रामभाऊ पोफळकर (४५) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील १२ जणांसह अन्य पर्यटकांना वाचविण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. नाताळाची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटकांचे आगमन होत आहे. मंगळवारी २५ रोजी सकाळी कळंगुट समुद्रात पर्यटकांना समुद्र सफरीसाठी एक बोट पर्यटकांना घेवून गेली होती. मात्र, ही बोट किनाऱ्यांपासून काही अंतरावर आलेल्या मोठ्या लाटेत उलटून बुडाली. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या बोटीत सुमारे २५ पर्यटक जलसफरीसाठी गेले होते. यात सध्या रा. कुर्ला-मुंबई व मूळ रा. खेड जि. रत्नागिरी येथील १३ जणांचे कुटुंबीय होते. बोट उलटल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांनी दुपारपर्यंत १३ पर्यटकांना बाहेर काढले. त्यातील सूर्यकांत पोफळकर (४५) यांचा बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या १२ पर्यटकांपैकी ८ पर्यटकांना सुरूवातीला कांदोळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील एका तेरा वर्षीय लहान मुलांसह पाचजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

बोटीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट समुद्रात उलटून बुडालेल्या बोटीची क्षमता १५ पर्यटकांची असताना प्रत्यक्षात २० पर्यटक या बोटीमध्ये घेण्यात आले होते. ही बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर गेल्यानंतर बोटीचे इंजिन बंद पडले, त्यामुळे बोट वळण घेत असतानाच आलेल्या जोरदार लाटेमुळे बोट उलटली. या बोटीतील सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट पुरवण्यात आली होती. परंतु खेडच्या दोन मुलांना लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते, असे तिच्या आईने सांगितले. त्या बोटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशीही चर्चाही घटनास्थळी सुरू होती.
दोन मुलांना लाईफ जॅकेट नाही…
मृत पोफळकर यांची पत्नी सारिका पोफळकर यांनी कळंगुट पोलिस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार, जलसफरीसाठी जाताना दोन मुलांना लाईफ जॅकेट दिले नव्हते. या दुर्घटनेत त्यांची आई, लहान मुलगी, बहीण व भाऊ यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांचेवर पुढील उपचार सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 26/Dec/2024














