मंडणगड : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सूचनेनुसार सुशासन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्देशानुसार मंडणगड तालुक्यात तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कार्यालयात १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात आला.
सुशासन सप्ताहात ७३ उत्पन्नाचे दाखले, ५ वय व अधिवास दाखले, २ शेतकरी दाखले, १२७ प्रतिज्ञापत्र तसेच १६ आदिवासी कुटुंबीयांना शिधापत्रिका देण्यात आल्या. तलाठी मंडल अधिकारी स्तरावर ९६ फेरफार नोंदणी निर्गमित करून ३४० सातबारा व ४२८ (अ) खाते उतारे व १५५ फेरफार उतारे वितरित करण्यात आले आहेत. या सप्ताहाच्या अनुषंगाने २१ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी कार्यालय व परिसराची स्वच्छता केली. २२ रोजी उपविभागीय कार्यालय दापोली व तहसील कार्यालय दापोली व मंडणगडच्यावतीने सर्व कर्मचारी, अधिकारी यांना डॉक्टर संजय कुंडेटकर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांनी महसूल विषयक बाबींचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाला दापोली, मंडणगड तालुक्यातील ९७ कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. २४ रोजी ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमांमध्ये १२ शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत व रेशन दुकानदारांच्या अडीअडचर्णीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला तालुक्यातील ग्राहक, रेशन दुकानदार, नागरिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 26/Dec/2024














