रत्नागिरी : आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत छोटू देसाई अॅकॅडमीने जिंकला रत्नदुर्ग चषक

रत्नागिरी : शहराजवळाल कोळंबे येथील सावंत (सासा) स्टेडियमवर गेली चार दिवस १६ वर्षांखालील आंतरशालेय निमंत्रित क्रिकेट स्पर्धा झाल्या. अटीतटीच्या व चौरंगी साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत येथील छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने विजय मिळवला.

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नवी-मुंबई, वाशी यांचे दोन संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजया क्रिकेट अॅकॅडमी बेळगाव व छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी यांच्यामध्ये चौरंगी स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात आली. स्पर्धेमध्ये छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने तिन्ही साखळी सामन्यांत विजय मिळवून अंतिम सामन्यात विजया क्रिकेट, अॅकॅडमी बेळगाव संघाचा आठ गडी राखून पराभव केला व रत्नदुर्ग क्रिकेट चषक स्पर्धा-२०२४ स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मिळवले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रत्नागिरीचे उद्योजक केशवराव इंदुलकर व सावंत क्रिकेट अॅकॅडमीचे केतन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी (सीडीसीए) विजेता, तर विजया क्रिकेट अॅकॅडमी, बेळगाव उपविजेता संघ ठरला. सामनावीर कुणाल गावडे, उत्कृष्ट फलंदाज ओंकार चौगुले, उत्कृष्ट गोलंदाज अर्णव भाटकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनिश तेंडुलकर, मालिकावीर अनुज देसाई यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या स्पर्धा यशस्वितेसाठी गजेंद्र पाथरे, लाल्याशेठ खातू, रमेश कसबेकर, हरीष लाडे, साईप्रसाद ऐरम, सुभाष पटवर्धन यांनी सहकार्य केले. सर्व सामन्यांकरिता दर्शना पवार, राज वेटकर यांनी पंचाचे काम पाहिले. सामने रोमहर्षक व अटीतटीचे झाल्यामुळे स्पर्धेमध्ये रंगत वाढली व शालेय क्रिकेटपटूंना स्पर्धेचा आनंद घेता आला, हेच या स्पर्धेचे यश असल्याचे संयोजक व सामन्याचे सूत्रसंचालन करणारे दीपक देसाई यांनी व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 26/Dec/2024