कुलूप उचकटून बेडरुममधील कपाटावर डल्ला; गुहागर बायपास रोडवरही चोरी झाल्याचे उघडकीस
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात भरदिवसा बंद घर फोडून चोरट्याने धाडसी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने घरातील रोकडसह सुमारे ८ लाख १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. या घटनेमुळे चिपळूण शहरात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाराचा कडी-कोयंडा उचकटून बेडरुममधील कपाटावर मारला डल्ला
चिपळूण येथील गोवळकोट रोडवरील अल नजु अपार्टमेंटच्या ‘ए’ विंगमधील रूम नंबर १०५ मध्ये राहणाऱ्या नगमा अबीदअली मुजावर (वय ४० वर्षे) या गुरुवारी दुपारी बाहेर गेल्या होत्या. दुपारी १२:३० ते ०१:४० या तासाभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्या तरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
एकूण ८ लाख १८ हजारांचा ऐवज लांबवला
चोरीस गेलेल्या मालात तब्बल ८ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ८ हजार रुपयांची रोख रक्कम समाविष्ट आहे.
- १ लाख ५० हजार रुपयांचे अडीच तोळे वजनाचे ३ सरीचे सोन्याचे मंगळसूत्र
- ६० हजार रुपयांचे १ तोळे वजनाचे एकेरी सरीचे मंगळसूत्र
- १ लाख ८० हजार रुपयांच्या ३ तोळे वजनाच्या एकूण ५ सोन्याच्या साखळ्या (चेन)
- ६० हजार रुपयांचा १ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस
- १ लाख २० हजार रुपयांची २ तोळे वजनाची कानातील ४ जोड कर्णफुले
- २ लाख ४० हजार रुपयांच्या ४ तोळे वजनाच्या एकूण १० सोन्याच्या अंगठ्या
- ८,००० रुपये रोख रक्कम
शहरात इतर ठिकाणीही घरफोडीचे सत्र
फिर्यादी नगमा मुजावर यांना मिळालेल्या माहितीनुसार, याच सुमारास चिपळूण-गुहागर बायपास रोडवरील द्वारका कृष्णकुंज बिल्डींगमध्ये राहणाऱ्या धनश्री भोसले यांच्याही बंद घरात चोरी झाली आहे. त्यांच्या घरातूनही दागिने आणि पैसे चोरीला गेल्याचे समोर आल्याने एकाच दिवशी घरफोडी करणाऱ्या टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल; चिपळूण पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच फिर्यादी यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (३) अन्वये गु.र.नं. २२१/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू केले आहे.














