विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांच्या हस्ते वाटप; CEIR प्रणाली अन् तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर
रत्नागिरी: Ratnagiri Police Success संदर्भात प्राप्त माहितीनुसार, नागरिकांचे हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देण्याच्या रत्नागिरी पोलीस दलाच्या मोहिमेला मोठे यश आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात १०३ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
तांत्रिक विश्लेषण अन् CEIR प्रणालीचा प्रभावी वापर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकडून प्राप्त झालेल्या गहाळ मोबाईल तक्रारींचे संकलन करण्यात आले. त्यानंतर सायबर पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषण व सी.ई.आय.आर. (CEIR) प्रणालीचा प्रभावी वापर करून हे १०३ मोबाईल शोधून काढले.
विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांच्या हस्ते वाटप रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना (भा.पो.से.) यांच्या हस्ते हे सर्व १०३ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. हरविलेला मौल्यवान मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिक आणि उपस्थितांनी रत्नागिरी पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
नागरिकांना सायबर जनजागृतीचे आवाहन यावेळी मार्गदर्शन करताना विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरुक राहण्याचे आवाहन केले. मोबाईल हरविल्यास किंवा चोरीस गेल्यास तात्काळ सी.ई.आय.आर. (CEIR) प्रणालीवर नोंदणी करून जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, तसेच कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास विलंब न करता रत्नागिरी पोलीस दलाशी संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, अमंलदार आणि नागरिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 31-07-2026














