गणेशोत्सव कारखाने आणि मच्छिमारांना वीज तुटवड्याचा फटका; महावितरण अभियंत्यांना ग्रामस्थांचे निवेदन
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज पुरवठ्यातील या त्रुटींमुळे नागरिक, मच्छिमार आणि स्थानिक उद्योजक त्रस्त झाले असून, या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी महावितरणच्या कोतवडे (खरवते) येथील साहाय्यक अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
भूमिगत विद्युत वाहिन्या आल्या वर; दुर्घटनेची शक्यता
काळबादेवी गावात काही काळापूर्वी भूमिगत विद्युत वाहिनीचे (अंडरग्राउंड केबल) काम करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे यातील काही केबल्स जमिनीच्या वर आल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय गावात बसवण्यात आलेले डीपी बॉक्स अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे परिसरात कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गणपती मूर्तिकार आणि मच्छिमारांना नाहक मनस्ताप
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे अनेक कारखाने रात्रंदिवस सुरू आहेत. या कारखान्यांना अहोरात्र सुरळीत वीजपुरवठ्याची तीव्र आवश्यकता आहे. तसेच गावात मोठ्या प्रमाणावर मच्छिमार व्यावसायिक असून, वीज वारंवार खंडित होत असल्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे.
महावितरणकडे तातडीने पाहणी करून कारवाईची मागणी
या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन वीज वितरण कंपनीने गावात प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आवश्यक दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महेश मनोहर मयेकर, विनय शशिकांत मयेकर, संदेश देवाजी बनव, प्रतिक चंद्रकांत नार्वेकर, समीर अशोक शेट्ये, समिक्षा समीर शेट्ये, अनिकेत रमेश वाटेकर, प्रणव गणेश वारेकर, खलील गाठीकोल, विवेक विजय मयेकर आणि उद्देश शंकर कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या निवेदनाची एक प्रत नाचणे रोड येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनाही पाठवण्यात आली आहे.














