चिपळूण पालिकेचे व्यापारी संकुलातील गाळे बंद

चिपळूण : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याशेजारी असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर या व्यापारी संकुलातील गाळे अनेक दिवस बंद अवस्थेत आहेत. बंद गाळ्यामुळे पालिका प्रशासनाने मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बुडणारा महसूल वाचविण्यासाठी बंद असलेले गाळे महिला बचत गट, नवीन छोटे व्यावसायिक यांच्यासाठी खुले करून द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन शेट्ये यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

चिपळूण पालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील शंकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एलटाईप शॉपिंग सेंटरची इमारत उभी केली. या इमारतीतील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत, मात्र गेली कित्येक दिवस येथील गाळे बंद आहेत. त्यामुळे नक्की हे गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत की नाही, जर दिले असतील तर संबंधित व्यावसायिक त्याचे भाडे पालिकेत नियमितपणे भरणा करतात का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

पालिकेकडून शहरात मालमत्ता कर आकारणीचे काम सुरू आहे. थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या जात आहेत. त्यानुसार इमारतीतील प्रत्येक गाळ्याच्या ठिकाणी काहींच्या नावासह नवीन स्वरूपाची घरपट्टी आकारणी केल्याचे दिसून येत आहे. तशा नोटिसा बंद गाळ्यांवर लावण्यात आल्या आहेत. या गाळ्याचे कर अनेक वर्ष भरलेले नाहीत. त्यामुळे पालिकेचे नुकसान होत असून महसूल बुडत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 27/Dec/2024