सावर्डे : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्टकडून बायो-फोर्टिफाइड (जैवसंपृक्त) भात लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. कीटकनाशकाचा वापर टाळून जैवसंपृक्त वाण वापरण्याचा प्रयोग यानिमित्ताने ट्रस्टने केला आहे.
वालावलकर ट्रस्टअंतर्गत डेरवण येथेही मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. ती संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनेच केली जाते. कोणतेही रासायनिक खत, कीडनाशक, तणनाशक वापरलं जात नाही. गेल्या तीन वर्षांपासून ट्रस्टने एक अभिनव, नावीन्यपूर्ण असा उपक्रम सुरू केला आहे. भाताचे रत्नागिरी ७ या जातीचे बियाणे शिरगाव (स्त्नागिरी) येथील भात संशोधन केंद्रातून आणले. सुरुवातीला अगदी मोठ्या प्रमाणातच लागवड केली. यावर्षी पाच एकर क्षेत्रावर याची लागवड केली. रत्नागिरी ७ ही भाताची जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. रत्नागिरी ७ या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे तांदूळ जाडा आहे. तांदळाचा रंग हा तांबूस-लालसर आहे. ही जात १०० दिवसांत काढणीस तयार होते. या जातीच्या तांदळामध्ये आहारासाठीची महत्त्वाची पोषणमूल्य (जस्त, लोह आणि विटामिन्स) जास्त प्रमाणात आहेत. ही जात जैवसंपृक्त म्हणजेच पोषण मूल्यांनी समृद्ध या प्रकारात येते.

जैवसंपृक्त वाण म्हणजे काय ?
धान्यपिकांमधील पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी नवीन जाती विकसित केल्या जात आहेत. अशा वाणांना बायोफॉटॉफाईड म्हणजे जैवसंपृक्त वाण म्हटले जाते. बाहेरून गोळ्या औषधे घेण्यापेक्षा नैसर्गिकरीत्या पोषकद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी जैवसंपृक्त पिके हा उत्तम पर्याय आहे. उत्पादन वाचवण्यासाठी धान्यावर आणि पिकावर किटकनाशकाचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. मग त्याचे दुष्परिणाम हे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने स्वरूप घेऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच जैवसंपृक्त वाण वापरण्याचा प्रयोग ट्रस्टने केला आहे.
या भाताच्या पोह्यांची चांगली चव
गेल्या दोन वर्षांपासून ट्रस्टने या भातापासून पोहे करून ते वापरले, जास्तीचे असतील तेव्हा विकले. या पोह्यांची चव ही न्यारीच आहे. या पोह्यालाही चांगली मागणी आहे. या आणि अशा प्रकारच्या जैवसंपृक्त (पोषण मूल्यांनी समृद्ध) पिकांच्या धान्यापासून आहारामध्ये कमी पडणारी पोषणमूल्यांची कमतरता कोणत्याही गोळ्या औषधे न घेता भरून काढता येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 27/Dec/2024












