निवे बुद्रुक येथील बीएसएनएल टॉवर बंद

साडवली : निवे बुद्रुक येथे काही महिन्यांपूर्वी भारत संचार निगम लिमिटेडचा टॉवर मंजूर झाला आणि त्याचे कामही सुरू झाले. दोन-तीन महिन्यांपूर्वी काम पूर्ण झाले; परंतु वीजजोडणी नसल्याने टॉवर तात्पुरत्या स्वरूपात सोलर सिस्टिमवर कार्यान्वित करण्यात आला. सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीच्या निवे ग्रामस्थांनी बीएसएनएलचे नेटवर्क आल्यामुळे आनंद व्यक्त केला. शेकडो ग्रामस्थांनी नवीन सीमकार्ड खरेदी केले; परंतु त्यांचा आनंद जेमतेम १५ दिवस टिकला. पुन्हा नेटवर्क बंद झाले.

तेथील वीजजोडणीचेही काम पूर्ण झालेले आहे; मात्र आजपर्यंत हा टॉवर पुन्हा चालू होऊ शकलेला नाही. याबद्दल ग्रामस्थांनी देवरूख येथील कार्यालयात चौकशी केली. तसेच रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयातही पाठपुरावा केला; मात्र सर्वच ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून योग्य उत्तरे मिळाली नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 28-12-2024