खेड : खेड तळेमार्गावर गुरुवारी मोटारीच्या धडकेत ठार झालेल्या प्रदीप ढेबे या दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्याअभावी ग्रामस्थांनी दीड किलोमीटरवर हातातून न्यावा लागला. त्यामुळे त्या मृतदेहाची फरफट मरणानंतर देखील सुरू होती.
प्रदीप प्रकाश ढेबे (वय २१, वावे-धनगरवाडी) या दुचाकीस्वाराचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी तळेनजीक घडला होता. दुचाकीस्वार तळे देऊळवाडी येथून खेडच्या दिशेने येत होता. याच दरम्यान तळेच्या दिशेने जाणाऱ्या कारने धडक दिल्यानंतर रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका करण्यात आली; परंतु ही रुग्णवाहिका किंजळेतर्फे नातू कळकरायवाडी या ठिकाणी येऊन थांबली. त्यानंतर पुढील मार्ग खराब असल्याने पायी जाण्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नसल्याने ग्रामस्थांनी मृतदेह हातात घेऊन दीड किलोमीटर पायपीट करत नेला. मागील दोन वर्षांपासून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे; मात्र ग्रामस्थांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जमीन मालकांनी विरोध केल्यामुळे हे काम रखडलेले असून, येथील नागरिकांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही रस्त्यासाठी न्याय मागावा लागत आहे.
खेड तालुक्यातील अनेक धनगर वाड्यांवर जाणारे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. एखाद्या रुग्णाला उपचारासाठी नेताना प्रत्येक किलोमीटरची पायपीट करून जावे लागत आहे. धनगर वाड्यांची परिस्थिती दयनीय असून याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. – रामचंद्र आखाडे, सामाजिक कार्यकर्ते
आठ दिवसांपूर्वी असाच प्रसंग
प्रदीप यांच्या मृत्यूपूर्वी आठ दिवस याच गावातील एका महिलेला सर्पदंश झाल्यामुळे त्यांनाही उचलून झोळीमधून कळकरायवाडी या ठिकाणी आणावे लागले. त्यानंतर पुढील उपचारासाठी न्यावे लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने किंजळेतर्फे नातू कळकरायवाडी ते धनगरवाडी तसेच वावेतर्फे नातू गायकरवाडी ते ढेबेवाडी हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती ग्रामस्थांनी केलेली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 28/Dec/2024












