रत्नागिरी : कोकणातील दुर्गम आणि डोंगराळ भागात कमी खर्चात खोदलेल्या शेततळ्यात पाणी साठवून त्याचा उपयोग आंबा, काजू लागवडीसाठी करण्याचा निर्णय जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतला आहे. त्यासाठी ५ बाय ५ मीटरचे जलकुंड खोदण्यासाठी जिल्हा नियोजनमधून अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला पावणेसहाशे शेततळ्यांचे तक्ष्य निश्चित केले असून, एका जलकुंडाला १५ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे, तर एका हेक्टरमध्ये चार जलकुंड बांधता येणार आहेत.
कोकण विभागातील बहुतांशी तालुके हे अत्यंत दुर्गम व डोंगराळ असून, जमीन हलकी, जांभी, कातळ, खडकाळ व तीव्र उताराची आहे. शेतकन्यांचे जमीन धारणा क्षेत्र सरासरी १ हेक्टरपेक्षा कमी आहे. कोकणात सरासरी पर्जन्यमान ३५०० ते ४ हजार मिलिमीटर असून, हवामान आंबा, काजू, नारळ, मसाला पिके व भाजीपाला आदी फळपिकांना पोषक आहे. कोकणात दरवर्षी विविध शासकीय योजना. सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक शेतकरी स्वतः आंबा, काजू, नारळ, मसाला पिके व भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करतात: परंतु फळबागा जिवंत राहण्याचे प्रमाण कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कोकणातील जमिनीत कातळ व डोंगर उतार असल्यामुळे लागवडीनंतर सुरवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीत कलमे किंवा रोपांना डिसेंबर ते मे या महिन्यांच्या काळात संरक्षित सिंचन देण्याची सुविधा पुरेशी उपलब्ध होऊ शकत नाही तसेच मोहोर अवस्थेतील पिकांना पाणी मिळत नाही.
त्यामुळे उत्पादन, उत्पादकता व गुणवत्तेवर परिणाम होतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील फलोत्पादन वर्गीय पिकासाठी ५ बाय ५ बाय २ मीटर आकारमानाचे जलकुंड तयार करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड आणि रत्नागिरी यांच्यापुढे ठेवला होता. त्याला विभागीय कृषी सहसंचालकांनीही मंजुरी दिली आहे. ०.१० ते २ हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी १५ हजार रुपये अनुदान दिले जाणार असून, एका तालुक्यासाठी ६४ शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. जिल्हा नियोजनमधून तरतूद केली गेली आहे. मार्च २०२२ पर्यंत हा निधी खर्च करावयाचा आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाचे कृषी अधीक्षक अधिकारी सदाशिव सदाफुले आणि तंत्र अधिकारी बापूराव शेंडगे यांनी दिली.
जलकुंडाचा गोळेगणी पॅटर्न
गोळेगणा (ता. पोलादपूर) येथे या टंचाईग्रस्त गावातील शेतकरी नामदेव दगडू येरूणकर यांनी त्यांच्या शेतात ५ बाय ५ मीटर अंतरावर ०.२५ हेक्टर क्षेत्रावर घन आंबा लागवड केली. त्यासाठी त्यांनी ५ बाय ५ बाय २ मीटर आकारमानाचे जलकुंड खोदले. त्याला ५०० मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक अस्तरीकरण करून ५२ हजार लिटर पाणीसाठा केला. त्याचा उपयोग फळबागांसाठी झाला. गोळेगणी गावातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ३६ जलकुंडांची यशस्वी निर्मिती केली. त्यामुळे प्रेरित होऊन परिसरातील इतर शेतकरीही या उपचाराचा वापर करण्यास प्रवृत्त झाले आहेत. हे जलकुंड कोकणातील सर्वसामान्य फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 28/Dec/2024












