उमरे ब्राह्मणवाडीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी बांधला वनराई बंधारा

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैयास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार निवासी शिबिरात स्वयंसेवकांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. उमरे ब्राह्मणवाडी येथे हा वनराई बंधारा बांधला.

देव, घैयास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे नुकतेच श्रमसंस्कार निवासी शिबिर झाले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारे बांधले, उमरे ब्राह्मणवाडी येथे वनराई बंधारा बांधला. याठिकाणी जलसंवर्धन करण्यासाठी वनराई बंधारा बांधला तसेच पाणवठ्याची स्वच्छता केली. यामध्ये स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व श्रमदानाचा आनंद घेतला. त्यामुळे ग्रामस्थांचा उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न काहीअंशी कमी होण्यास मदत मिळाली. पाण्याची पातळी वाढण्यासही मदत झाली. दुपारच्या सत्रामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात नवनिर्माण कॉलेजचे प्राध्यापक सुशील साळवी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रकारच्या खेळ आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मुलांना व्यक्तिमत्त्वात कोणते गुण असावेत हे सांगितले. या सत्राच्या माध्यमातून स्वयंसेवकांना संघभावना आणि उत्तम समन्वय कसा असावा, हे सांगितले. संध्याकाळी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली. आवाजाचा उपयोग करिअरसाठी कसा करू शकतो, याबद्दल त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

पाणी पातळी वाढण्यास मदत
उन्हाळ्यात कोकणातील पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. हा प्रश्न काही अंशी सोडविण्याच्या उद्देशाने देव, घैयास, कीर महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे नुकतेच श्रमसंस्कार निवासी शिबिर झाले. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उमरे ब्राह्मणवाडीत वनराई बंधारा बांधून संभाव्य पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 28/Dec/2024