मंडणगड : गोठे ग्रुपग्रामपंचायतीने बंधारे बांधून जलसंवर्धनाचा दिला आदर्श

मंडणगड : तालुक्यातील गोठे ग्रुपग्रामपंचायतीने गोठे, खलाटी, धामणी, कळकवणे या गावांच्या परिसरात दहा बंधारे बांधून जलसंवर्धन कामांचा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे या गावांच्या परिसरात जलस्रोतांचे बळकटीकरण होऊन पशुपक्षी, जनावरे यांना पाण्याचा आधार निर्माण झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत १६१ बंधारे बांधण्यात आले असून, त्यामध्ये ३६ वनराई, ७९ विजय, ४६ कच्चे बंधाऱ्यांचा समावेश आहे.

पाणी आडवा, पाणी जिरवा, या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी श्रमदानातून बंधारे उभारले जातात. जिल्ह्यात साडेआठ हजार बंधाऱ्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे. एप्रिल-में या उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, या हेतूने हे बंधारे बांधण्यात येत आहेत. गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येतो. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात असून, यामध्ये कच्चे बंधारे, वनराई बंधारे, विजय बंधारे या बंधाऱ्यांचा समावेश आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, कपडे धुणे, गाई-गुरांसाठी व जंगली प्राण्यांसाठी होतो. बंधारा बांधल्यानंतर अडलेले पाणी जमिनीत जिरत असल्याने विहिरीची पातळी वाढण्यास मदत होते, त्याचबरोबर एप्रिल-मे महिन्यांत पाणीपातळी टिकून ठेवण्यात या बंधाऱ्यांचा उपयोग होतो. ज्या परिसरात बंधारे बांधले आहेत त्या ठिकाणी पशु पक्ष्यांचा वावर व वृक्षसंपदादेखील वाढत आहे. परिणामी, ही गावे निसर्गसंपन्न होत आहेत. गोठे ग्रामपंचायत क्षेत्रातील गोठे, गोठे खलाटी, धामणी, कळकवणे ग्रामस्थांनी पाणी अडवण्यासाठी केलेले श्रमदान हे आदर्श घेण्यासारखे आहे.

मोहीम वेळीच राबवणे आवश्यक
मंडणगड तालुक्याची भौगोलिक रचना ही डोंगराळ आणि उताराची असल्याने पाणी जलदगतीने वाहून जाते. त्यामुळे पाऊस गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह कमी असताना ही बंधारे मोहीम सुरू केल्यास याचा अधिक फायदा होऊ शकतो; मात्र डिसेंबरमध्ये ही मोहीम राबवण्यात येत असल्याने बहुतांशी पाणी वाहून जात असून, पात्र कोरडे होऊन जाते.

गोठे ग्रामपंचायतीतील नागरिकांचा हिताच्या प्रत्येक उपक्रमाला पाठिंबा आणि सहकार्य मिळते. जलसंवर्धन बंधारे मोहिमेला उत्स्फूर्तपणे सहभाग मिळाला असून, ग्रामस्थ, महिलांनी बहुमोलाचे श्रमदान केले. दीपक टेमकर, ग्रामपंचायत अधिकारी, गोठे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 28/Dec/2024