देवरूख : तळेकांटे देवरूख राज्य महामार्गावर पांगरी येथील आरोग्य उपकेंद्र थांब्यावर असलेल्या प्रवासी मार्ग निवाऱ्याचा (पिकअप् शेड) चौथरा ढासळला असून, हा निवारा धोकादायक बनला आहे. याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.
तळेकांटे ते देवरूख, मारळ, कळकदरा या १७४ क्रमांकाच्या राज्य महामार्गाचे काही वर्षांपूर्वी काम करण्यात आले आहे. एक उत्तम दर्जाचा रस्ता म्हणून या मार्गाच्या कामाचे उदाहरण अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर नमूद केले आहे. तसेच प्रत्येक थांब्यावर प्रवासी मार्ग निवारे बांधण्यात आले. यापैकी पांगरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र थांब्यावरील हा निवारा मागील निसरड्या भरावामुळे खचला असून, त्याचे बांधकाम ढासळले आहे. त्यामुळे तेथे उभे राहणे धोकादायक बनले आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मार्गनिवाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आल्याची माहिती सरपंच सुनील म्हादे यांनी दिली. तसेच लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष घालावे, अशी मागणीही ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 28/Dec/2024














