रत्नागिरी : दूरसंचार मंत्रालयातून बोलत असल्याची बतावणी करत वृद्धाची ६१ लाख १९ हजारांची फसवणूक

रत्नागिरी : मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून तसेच पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करीत दोन संशयितांनी एका वृद्धाची तब्बल ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना शनिवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते शुक्रवार, २७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नाचणे परिसरात घडली. याप्रकरणी साई प्रसाद पुरुषोत्तम गावडे (६५, रा. साई छाया सदन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे, रत्नागिरी) यांनी शनिवार, २८ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संशयितांपैकी एकाने फिर्यादी यांना फोन करुन मी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करत फिर्यादींना तुमचे सिमकार्ड बंद होणार असल्याची भीती घातली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रारीकरता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा करत दुसऱ्या संशयिताने फिर्यादीशी २१ डिसेंबर ते २७ डिसेंबरच्या कालावधीत व्हॉटस्अॅपवरून हेमराज कोळी नावाचा पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही संशयितांनी संगनमताने फिर्यादीला तुमच्या बँक खात्यातून २ कोटी रुपयांचा मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भीती घालून त्यांच्या बँक खात्यातून ६१ लाख १९ हजार ८० रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८, (४), ३१९ (२) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 30/Dec/2024