खेड : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्र. दोन मूल्यांकनांतर्गत शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित, छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे या शाळेला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.
सन २०२३-२४ पासून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजना अमलात आली. या अभियानाच्या माध्यमातून शाळेचे सौंदर्याकरण, स्वच्छता, विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास, परसबाग, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यासारखे निकष लावण्यात आले होते. अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे व गुणवत्तेचे केंद्र, तालुका पातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले व यामध्ये प्रशालेने प्रथम क्रमांक मिळविला. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील सन २०२२-२३ मूल्यांकनामध्ये सदर शाळेने व्दितीय क्रमांक मिळविला होता.
प्रशालेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व वैयक्तिक विकासासाठी वाचन चळवळ सुरू करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धा, लेखन, संगीत, कला, क्रीडा व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रशालेकडून अद्ययावत बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रशालेने मिळविलेल्या या यशाचे कौतुक संस्थेचे शिल्पकार व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम, संस्थेच्या अध्यक्षा सौ. ज्योती कदम, संस्थेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, संस्था सचिव योगिता कदम- कापडी, ना. योगेश कदम, खजिनदार काशिराम सकपाळ, संचालक अरूण उर्फ चंद्रकांत कदम यांनी कमांडंट, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 30/Dec/2024














