खेड : कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या व तुतारी एक्सप्रेस गाड्यांचे स्लीपर डबे जनरल डबे बनले आहेत. या डब्यांमध्ये वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांसह जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांची घुसखोरी वाढल्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना गाडीत शिरणे मुश्कील झाले आहे.
रेल्वेच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या आरक्षित डब्यामध्ये वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना चढण्यास मनाई आहे, अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई अथवा त्यांना गाड्यांमधून उतरवण्यात येते; पण याची अंमलबजावणी कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये होतच नाही. त्यामुळे आगाऊ आरक्षण करून आरामात प्रवास करायला मिळेल, या अपेक्षित असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोएसटी येथून रात्री ११ वा. सुटणाऱ्या कोकणकन्या व दादर येथून मध्यरात्री १२.०५ वा. सुटणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोच डब्यामध्ये सुरुवातीपासूनच वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांसह जनरल डब्याची तिकीट काढलेले प्रवासी चढतात.

शौचालयाला जाण्याचे वांदे
मुंबई कोकण प्रवास ९ ते १० तासाचा, त्यामुळे साहजिकच रात्री लघुशंकेला जाणे आवश्यक असते; पण गर्दीमुळे शौचालयापर्यंत पोहोचणे तारेवरची कसरत असते. खाली बसलेल्या लोकांना तुडवत तुडवत कसेतरी शौचालयापर्यंत पोहोचल्यानंतर शौचालयाच्या दरवाज्यावरही अनेक प्रवासी बसले असतात. त्यामुळे दरवाजा उघडणेही अशक्य होते. याचा सर्वाधिक त्रास वयोवृद्ध महिला व मधुमेही रुग्णांना होतो. त्यात शौचालयापर्यंत पोहचण्यासाठी खाली बसलेल्या प्रवाशांची बोलणीही ऐकावी लागतात.
कोकण रेल्वे आणि गर्दी हे एक समीकरणच बनले आहे. परंतु, स्लिपर कोचमध्ये तत्काळसह जनरल डब्याचे तिकीट असलेल्या प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. यावर आळा घालण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी. – गणेश वाळंज, कोकण रेल्वेप्रवासी, वावेतर्फे नातू, खेड
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 01/Jan/2025













