खेड : कशेडी बोगद्यात विजेचा खेळखंडोबा

खेड : मुंबई-गोवा महामार्ग चौपदीकरणातील महत्वाचा टप्पा असलेल्या कशेडी बोगद्यातून सध्या एकेरी वाहतूक सुरू झाली आहे; मात्र त्यामधील काही कामे अपूर्णच आहेत तर दुसऱ्या बोगद्यामधील कामे प्रजासत्ताक दिनापर्यंत पूर्ण करण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. दोन्ही बोगद्यांमध्ये २४ तास वीजपुरवठा कार्यान्वित राहावा, यासाठी महावितरणकडे ११०० केव्ही विजेची मागणी केली आहे. सध्या अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे वाहतूक सुरू असलेल्या टनेलमध्ये अनेकवेळा काळोखाचा सामना करावा लागत आहे. कशेडी बोगद्याचे काम पूर्ण करण्याबाबत सार्वजनिक विभागाकडून आतापर्यंत अनेक डेडलाईन दिलेल्या होत्या; परंतु काम अजूनही अपूर्णच आहे. सद्यःस्थितीत एका बोगद्याच्या विद्युतीकरणाचे काम अद्यापही सुरूच आहे. त्या बोगद्यातील विद्युत पुरवठा दिवसभरात अनेकवेळा खंडित होतो. त्यामुळे वाहनचालकांना वाहने हाकताना काळजी घ्यावी लागते. दोन दिवसांपूर्वी अर्ध्या भागातील वीजपुरवठा खंडित होता, तर अर्ध्या भागातील वीज सुरू होतो.

महावितरणकडून पुरेशी वीज मिळत नसल्याने हा खेळखंडोबा सुरु असल्याने बांधकाम विभागाचे म्हणे आहे हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली आहेत. दुसऱ्या बोगद्यात पंखे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत भोगावनजीक एका पुलावर स्लॅब टाकण्यात येत आहे. बोगद्यातील विद्युतीकरणासह इतर प्रलंबित कामेही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही बोगद्यातून वाहतू‌क सुरू करण्याचा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचा मानस आहे.

दोन्ही बोगद्यांमध्ये गळतीची समस्या आजही कायम आहे. दोन्ही बोगद्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील काही पुलांची कामे प्रलंबित आहेत. ती पूर्ण झाल्याशिवाय दोन्हों बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वेगवान अन् आरामदायी प्रवास सुरू होणे मुश्कील आहे.

बोगद्यातील वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणकडे ११०० केव्ही विद्युत पुरवठ्याची मागणी केली आहे. काही तांत्रिक बाबींची लवकरच पूर्तता केली जाईल. दोन्ही बोगद्याच्या मध्यभागी कंट्रोल रूम तयार करण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर बोगद्यात खंडित होणारा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत होईल. विद्युतीकरणानंतर जानेवारी अखेरपर्यंत दोन्ही बोगदे पूर्णक्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील. पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 02/Jan/2025