गणपतीपुळे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व विक्री प्रदर्शनामध्ये कोकणातील विविध विविध कलात्मक वस्तू आणि कोकणी उत्पादने पर्यटकांसाठी खास पसंतीची ठरली. यंदाच्या नाताळ हंगामात सरस प्रदर्शन पर्यटकांसाठी विशेष लक्षवेधी ठरले.
हे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन हे ग्रामीण भागातील स्वरोजगार, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. यामध्ये बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तु, विविध प्रकारचे घरगुती मसाले, पिठे, पापड, लोणचे, कोकम, आगळ, कोकणी मेवा, विविध फळांचे सरबत, रस, कोकणी खाद्यपदार्थ, आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे, मध माफक दरात पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आले.
दि. २८ डिसेंबर १ जानेवारी या कालावधीत सुरू झालेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात पर्यटकांनी तसेच स्थानिक ग्राहकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. याचा फायदा सरस प्रदर्शनास सहभागी झालेल्या सर्वच बचत गटांच्या स्टॉल धारकांना होऊन मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शनात बचत गटांच्या सर्व स्टॉल धारकांना रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, तालुका विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी, जिल्हा अभियान व्यवस्थापक अय्याज पिरजादे, जिल्हा विपणन व्यवस्थापक अमोल काटकर, जिल्हा व्यवस्थापक माहिती संकलन नयना बोरकर आदींनी भेट देऊन मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सुरुवातीपासूनच बचत गटांच्या स्टॉल ना भेटी देऊन विविध वस्तू आणि उत्पादनांची माहिती घेऊन त्यांचे विशेष कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 03/Jan/2025














