रत्नागिरी : इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे आणि पाश्चिमात्य चुकीच्या पायंड्यांमुळे पाच-सहा पिढ्यानंतर मराठीचे अस्तित्व धोक्यात येईल. त्याला आपणच जबाबदार असू, त्यामुळे आपणही सर्वांनी मराठी बोलू, वाचू, मराठीचा अभिमान बाळगू या, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि केजीएन सरस्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमालेत दुसरे शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. राणी लक्ष्मीबाई सभागृहात या व्याख्यानाला गर्दी झाली. डॉ. शेवडे यांनी मराठीबाबत आपली रोखठोक मते व्यक्त केली.
डॉ. शेवडे म्हणाले की, जगात चिनी भाषा सर्वांत जास्त लोक बोलतात. इंग्रजीचा क्रमांक तिसरा लागतो. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. संस्कृतच्या गटात बसणारी ही भाषा असून बोलणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. परंतु आपण पूर्ण मराठीत बोलत नाही. इंग्रजी माध्यमांतून शिकल्यामुळे अनेक मुलांना मराठीतील शब्दांचे अर्थ कळत नाहीत. त्यामुळे शुद्ध मराठी बोलण्याकरिता वाचन व बोलणे याचे धडे गिरवले पाहिजेत. मराठीला जरी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरीही मराठी माणसाने तिचा व्यवहारात उपयोग करताना तिचा गुणात्मक दर्जा टिकवला पाहिजे. योग्य जागी योग्य शब्द वापरावेत. त्यासाठी घरातूनच आपली भाषा जपली पाहिजे. ब्राझीलमध्ये १००८ भाषा बोलल्या जायच्या. त्या तेथील जमातींनी टिकवून ठेवल्या होत्या. ब्राझीलवर पोर्तुगीजांनी आक्रमण करून तिथल्या भाषा नष्ट केल्या. आज फक्त १०० जमाती आहेत व तेथील लोक आपली मूळ भाषा विसरले व पोर्तुगीज भाषेत ते बोलतात. याउलट इस्रायलने मृत झालेली हिब्रू भाषा खोदून काढली व तिचे पुनरुज्जीवन केले. तिलाच शिक्षणाचे माध्यम बनवले.
डॉ. शेवडे म्हणाले, इंग्रजांनी भारतात गुलामीची चिन्ह ठेवली. परंतु आपल्या मराठी मुलांना संतांच्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यातील गोडवा कळत नाही. कारण घरातील परवचा बंद झाली. नकळत्या वयापासून शुभंकरोती, रामरक्षा व परवचा पाठ होत असे. परंतु आता पालकांना त्यासाठी वेळ नाही. मात्र टीव्हीवर सासू-सुनांच्या भांडणाच्या मालिका बघायला वेळ असतो. आपण जबाबदारीने वागलो, मराठी बोललो तरच मराठी जगणार आहे, असे मत डॉ. शेवडे यांनी व्यक्त केले.
कोणत्याही सभा, संमेलनात मंचाला व्यासपीठ शब्द वापरला जातो. व्यासपीठ म्हणजे व्यासांचे पीठ. म्हणजे जेथून प्रवचनकार प्रवचन देतात. त्यामुळे सर्रास व्यासपीठ हा अयोग्य शब्द वापरण्याऐवजी मंच शब्द वापरावा, असेही ते म्हणाले.
ब्रिटिशांच्या जमान्यात बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र काढणे व ते चालवणे ही कठीण गोष्ट होती. त्यावेळी १ रुपया किंमत होती. तरीही तेव्हा दर्पणचे ३०० अंक वितरित होते. तेव्हा थेट ब्रिटिशांच्या विरोधातही त्यांनी वेगळ्या शैलीत लिखाण केले, असे डॉ. शेवडे म्हणाले.
संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी डॉ. शेवडे यांचा सत्कार केला. संघाचा दर्पण पुरस्कार डिजिटल माध्यमातील ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कोनकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात बातमीदार व उपसंपादक यांच्या जबाबदाऱ्या आणि संघाच्या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याचे मनोगत व्यक्त केले. मंचावर ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे उपस्थित होते. याप्रसंगी साहित्यिक, नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, राजेंद्रप्रसाद मसुरकर, प्रमोद कोनकर, उमेश आंबर्डेकर आणि मकरंद पटवर्धन यांना डॉ. शेवडे यांच्या हस्ते सन्मानित केले. संघाच्या सचिव शिल्पा पळसुलेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 08-01-2025












