गुहागर: गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील पोस्ट कार्यालयात एक अत्यंत धक्कादायक आणि निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून ग्रामस्थांच्या हक्काची टपाल (पोस्ट) संबंधित पोस्टमनने वितरीतच केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोस्ट विभागाने संबंधित पोस्टमन करन थोरात (बीड) याला त्वरित निलंबित केले आहे.
काय आहे नेमका प्रकार? वेळणेश्वर येथील ग्रामस्थांना गेल्या दीड वर्षांपासून महत्त्वाची टपाल मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वारंवार पाठपुरावा करूनही टपाल मिळत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशू जोशी यांनी शनिवारी वेळणेश्वर पोस्ट कार्यालयाला तातडीने भेट देऊन तपासणी केली. या तपासणीत दीड वर्षांपासून टपाल वितरण झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
पोस्टमन निलंबित, नवीन नियुक्तीची तयारी या निष्काळजीपणाबद्दल पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशू जोशी यांनी कारवाई करत पोस्टमन करन थोरात याला निलंबित केले आहे. या प्रकरणाची सखोल खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी सोमवारपर्यंत वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात नवीन पोस्टमनची नियुक्ती केली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.
अडकलेली टपाल पोहोचवण्यास सुरुवात पोस्ट प्रशासनाने अडकलेली टपाल शोधून ती संबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:
- आधार कार्ड
- एटीएम कार्ड
- बँकेचे पासबुक आणि चेकबुक
- कायदेशीर आणि सरकारी महत्त्वाच्या नोटिसा
नुकसान भरपाईचा प्रश्न ऐरणीवर टपाल वेळेत न मिळाल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. या नुकसानीची दखल घेत, ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांचे लेखी म्हणणे पोस्ट विभागाकडून घेतले जात आहे. यावर वरिष्ठ स्तरावरून जो निर्णय होईल, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल, असेही हिमांशू जोशी यांनी सांगितले.
वेळणेश्वरच्या या घटनेमुळे पोस्टाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 27-04-2026










