उत्तम करिअरसाठी विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळावे : नरेश पाचलकर

राजापूर : आजकाल विद्यार्थी मैदानावर कमी आणि मोबाईलमध्ये जास्त व्यस्त असल्याचे दिसून येते. आज प्रो कबड्डीसारख्या खेळात आपल्याच मातीतील खेळाडू निवडले जात आहेत. उत्तम करिअरसाठी विद्यार्थ्यांनी खेळाकडे पाहिले पाहिजे. कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, रनिंग अशा सांघिक व वैयक्तिक खेळात प्राविण्य मिळवून तुम्ही स्वतः बरोबरच तुमच्या शाळा, तालुका, जिल्ह्याचे नाव रोशन करा. क्रीडा स्पर्धेत आपल्यातला खेळाडू शोधून करिअर उज्ज्वल करा, असे प्रतिपादन सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस नरेश पाचलकर यांनी केले. ते श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग रत्नागिरीद्वारा आयोजित शासकीय मुला-मुलींच्या वस्तीगृह्यतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा व कला सांस्कृतिक महोत्सव सन २०२४ – २५ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रत्नागिरीचे दीपक घाटे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, हेरिटेज कल्चर रत्नागिरीचे सदस्य संतोष कांबळे, समाज कल्याण रत्नागिरीच्या लेखाधिकारी दीपाली केळकर, समाज कल्याण रत्नागिरीच्या ओ. एस. विजया मोरे, समाजकल्याण रत्नागिरीचे निरीक्षक प्रताप कांबळे, सरस्वती विद्यामंदिर पाचलचे क्रीडा शिक्षक नितीन सांडम, खापणे महाविद्यालयाचे राजेश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नरेश पाचलकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या संचलनातून ध्वजाला व मान्यवरांना मानवंदना दिली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एस. मेश्राम यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. मान्यवरांना कॅप भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवावा. त्यांच्या खेळाची दखल पुढील प्रत्येक टप्प्यावर घेतली जाईल.

विद्यार्थ्यांतील हे क्रीडा गुण ओळखून त्यांच्या उत्तम खेळासाठी सहकार्य होत राहील. म्हणूनच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपले प्राविण्य दाखवावे, असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून दीपक घाटे यांनी केले. या स्पर्धेत २३० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष कांबळे यांनी तर आभार माहेश्वरी विचारे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 10/Jan/2025

Ratnagiri Khabardar add image