दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. महाभियोगाचा सामना करणाऱ्या राष्ट्रपती यून योल यांना अटक करण्यासाठी पोलीस पोहचलेत, ही बातमी कळताच यून सुक योल यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांची आणि विरोधकांची गर्दी जमा झाली.
यून सुक योल यांना अटक करण्याचा प्रयत्न याआधीही पोलिसांनी केला होता. मागील वर्षी ३ डिसेंबरला मार्शल लॉ लावण्याची घोषणा योल यांनी केली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर काही तासांतच हा निर्णय बदलावा लागला.
१४ डिसेंबरला यून सुक योल यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव संसदेत पारित करण्यात आला होता परंतु त्यांना राष्ट्रपती पदावरून देशाच्या कायदेशीर प्रक्रियेतूनच हटवलं जाऊ शकत होते. ३१ डिसेंबरला दक्षिण कोरियाच्या एका कोर्टाने यून सुक योल यांच्या अटकेचे वॉरंट जारी केले होते. एक हँडबॅगमुळे यून सुक योल यांच्यावर हे संकट ओढावले, त्यामागचे नेमकं कारण काय, दक्षिण कोरियातील अवस्था बांगलादेश आणि श्रीलंकासारखी झालीय का, जिथे नेतृत्वाला देश सोडून पळावं लागलं होते हे सर्व जाणून घेऊया.
दक्षिण कोरियात परिस्थिती का चिघळली?
यून पीपुल्स पॉवर पक्षाचे नेते आहेत. त्यांनी २०२२ साली त्यांचे कट्टर विरोधक जे म्युंग यांचा अवघ्या ०.७ टक्के एवढ्या कमी फरकाने पराभव केला. १९८७ साली दक्षिण कोरियात थेट निवडणूक झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या कमी मताधिक्याने सरकार आले होते. राष्ट्रपती यून मागील काही काळापासून विरोधकांच्या टार्गेटवर आलेत. बांगलादेश इथेही हीच परिस्थिती उद्भवली ज्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळावं लागले. त्याआधी श्रीलंकेतही राष्ट्रपतींना देश सोडण्यास आंदोलकांनी भाग पाडलं होते.
‘मार्शल लॉ’ घोषित करणं ठरली घोडचूक?
दक्षिण कोरियात बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहता यून यांनी देशात इमरजेन्सी म्हणजे मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली होती. हे पाऊल देशातंर्गत वाढणारा तणाव, विरोधी आंदोलने आणि सीमाभागात अस्थिरता यामुळे उचलले गेले. मार्शल लॉ लागू झाल्यापासून नागरिक सेवेचे बहुतांश अधिकार सैन्य अधिकाऱ्यांकडे सोपवले गेले. उत्तर कोरियातील कम्युनिस्ट ताकदीपासून वाचण्यासाठी आणि देशविरोधी घटकांना संपवण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचित होते असं यून सुक योल यांनी म्हटलं होते. मात्र हीच त्यांची घोडचूक ठरली. ३ डिसेंबरला रात्री मार्शल लॉ लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यून यांना निर्णय बदलावा लागला. मार्शल लॉविरोधात सत्ताधारी आणि विरोधी दोघांनीही यून सुक योल यांच्या निर्णयाचा विरोध करत आंदोलन सुरू केले.
पत्नीच्या वागणुकीमुळे मागितली देशाची माफी
राष्ट्रपती यून मागील काही काळापासून वादात अडकले आहेत. जनतेमध्ये त्यांच्याविरोधात रोष व्यक्त होत आहे. त्यांची पत्नी किम किन याही अनेक कथित घोटाळे आणि वादात सापडल्या आहेत. शेअरच्या किंमतीत हेरफार, लग्झरी हँडबॅग खरेदी केल्याचाही आरोप आहे. पत्नीच्या वागणुकीमुळे राष्ट्रपतींना देशाची माफी मागितली होती. ३ मिलियन वॉन म्हणजे जवळपास २ लाख रुपये किंमतीची हँडबॅग होती. ज्यांनी हे महागडे गिफ्ट दिले त्यांना यून यांच्याकडून फायदा झाला होता असा आरोप विरोधकांनी केला. मे २०२२ पासून हे प्रकरण समोर आल्यापासून यून सातत्याने अडचणीत सापडले आहेत आणि आता त्यांच्या अटकेपर्यंत हे प्रकरण पोहचले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 15-01-2025