रत्नागिरी : जिल्ह्यात सापडले 34 क्षयरुग्ण

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत जोखमीग्रस्त भागातील 1 लाख 59 हजार 299 जणांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 3 हजार 659 संशयित क्षयरुग्ण म्हणून सापडले होते. यापैकी फक्त 34 अंतिम निदान झालेले रुग्ण सापडले.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा प्र.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जोखीमग्रस्त भागातील क्षयरोग निदानापासून वंचित असणार्‍या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दि. 23 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. या मोहिमेत जोखीमग्रस्त भागातील एकूण 1,59,299 लोकसंख्येची तपासणी झाली असून त्यापैकी 3,659 संशयित क्षयरुग्ण व्यक्ती आढळल्या. या संशयित क्षयरुग्णांपैकी अंतिम निदान झालेले 34 क्षयरुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली आहे.

ही मोहीम जिल्ह्यातील चिरेखाणीतील कामगार, कारागृहातील कैदी, दिव्यांग शाळा व वसतिगृह, वृध्दाश्रम, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार व मजूर, निर्वासितांची छावणी,औद्योगिक कामगार वसाहत, आदिवासी वाडीवस्ती, पोहचण्यासाठी अवघड गावे आणि वस्त्या,ज्या गावात टीबी रुग्ण जास्त आहेत अशी गावे, आदिवासी शाळा व वसतिगृह, लोकसमुदायातील अतिकुपोषित भाग म्हणून ओळख असलेला आदिवासी भाग, एचआयव्ही अतिजोखीम गट,बेघर व रस्त्यावरची मुले, अनाथालय, मागील 2 ते 3 वर्षापासून टीबी रुग्णाच्या संपर्कात व सहवासात असलेली व्यक्ती, 60 वर्षापेक्षा अधिक वयाची व्यक्ती, धूम्रपान करणारे, मधुमेही अशा शहरी, ग्रामीण, आदिवासी जोखीमग्रस्त भागाच्या ठिकाणी राबविण्यात आली

क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला तसेच दोन आठवडयापेक्षा मुदतीचा ताप असणे , मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट होणे, मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही धुंकीवाटे रक्त पडणे , मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 16/Jan/2025