सासुरवाडीतून दागिने घेऊन पसार झालेल्या जावयाच्या सापळा रचत मुसक्या आवळल्या

मंडगणड : सासुरवाडीत येवून सासूचे दागिने घेवून पसार झालेल्या जावईबापूला मंडणगड पोलीसांनी साध्या वेशात सापळा रचून शिताफीने पकडले आहे. आरोपीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

याविषयी पोलीसांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भादाव येथे राहणारा आणि मंडणगड पालवणी येथील गोसावी वाडीचा जावई असलेल्या समिर शंकर गोसावी हा पाहुणा म्हणून पाहुणाचारासाठी सासुरवाडी पालवणीत आला होता. एके दिवशी सासू बचत गटाच्या मिटींगसाठी वाडीत गेली असता जावयाने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दोन तोळयाचे मंगळसुत्र अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन त्याने पोबारा केला. ही बाब सासूबाई घरी आल्यावर तिच्या लक्षात आली. आणून देईल या भाबड्या आशेने सासू सास-याने वाट पाहिली मात्र तो काही चूकूनही परत फिरकला नाही. त्यामुळे अखेर सासरे शिवाजी पांडुरंग नवघरे (वय ५४) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेत घडल्या प्रकारची ८ जानेवारी २०२५ रोजी चोरीची जावयाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत समिर गोसावीला धुंडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मित्र मोबाईलच्या लोकेशनव्दारे काही ट्रेस लागत नव्हता. मंडणगड पोलीसांना तो – म्हाप्रळ येथे बायकोला भेटण्यासाठी येणार असल्याचा गोपनीय माहितीच्या आधारे सुगावा लागला आणि समिर अलगद पोलीसांच्या हाती सापडला. मंडणगड पोलीसांनी केलेल्या या सातत्यपूर्ण अशा तपासामुळे चोरटयाला जेरबंद करण्यास यश आले आहे.

ही महत्त्वाची कामगिरी मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना मांडवकर, पोउनि धूपकर, चालक पोहावा देसाई ही टीम म्हाप्रळ येथे साध्या गणवेशांत रवाना झाली. तेथे गोपनीयरित्या आरोपीचा शोध घेऊन एका ठिकाणी दबा धरुन बसली. ठिक १३.१० वा आरोपी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी आरोपी म्हाप्रळ येथे येताच त्यास शिताफिने ताब्यात घेतले. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 17-01-2025