पात्र मतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही सुदृढ करावी : उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

◼️ एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात १५ वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : तरुण म्हणजे देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदारयादीत आपले नाव नोंदवावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला सुदृढ करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले.

१५ वा राष्ट्रीय मतदार दिन आज (२५ जानेवारी) उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मारूती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, दिव्यांग मतदारांचे आयकॉन संकेत चाळके, शक्ती सेवा संस्थेच्या अध्यक्ष तसेच तृतीयपंथी मतदारांच्या आयकॉन पल्लवी परब, युथ आयकॉन शिवम परब आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी भारत निवडणूक आयोगाच्या नथिंग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर या थीमचे प्रसारण करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली. यावेळी प्रास्ताविक करताना श्री. गायकवाड यांनी २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका निर्भय वातावरणात पार पडल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. रत्नागिरी जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने या ठिकाणी निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडणे कौशल्याचे काम होते. ती कामगिरी सर्वच कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडल्याचे गौरवोउद्गार त्यांनी यावेळी काढले.

नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होणे म्हणजे खऱ्या अर्थाने युवकांमध्ये जागृतीचे मोठे अभियान प्रशासनामार्फत राबविले जात असल्याचे सांगितले. जात, धर्म, लिंग यापलीकडे एकच गोष्ट समान आहे ती म्हणजे मतदान. संविधानाने सर्वांनाच याबाबतीत एकाच पातळीवर आणून ठेवले आहे. त्यामुळे आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, असे सांगून आमच्या महाविद्यालयातील सर्व पात्र नवमतदार मतदार नोंदणी करून नक्कीच आपला मतदानाचा हक्क बजावतील, असे आश्वासन यावेळी श्री. हेगशेट्ये यांनी दिले.

उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्री. बोरकर यांनी निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा, मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून २५ जानेवारी २०११ पासून हा दिवस साजरा केला जात असल्याचे नमूद करतानाच सर्व प्रकारचे घटक यात सामील व्हावे यासाठी “स्विप”अंतर्गत विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मोबाईल मधील विविध ॲपच्या माध्यमातून ही बसल्या जागेवर मतदार यादीत आपले नाव नोंदवता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उत्कृष्ट काम केलेले बीएलओ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, महाविद्यालयीन स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल अधिकारी आणि विविध क्षेत्रातील दिव्यांग व तृतीय पंथीय आयकॉन यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये निवडणूक नायब तहसीलदार (दापोली) समीर सावंत, श्रीमती स्नेहल मेहता (गुहागर), नायब तहसीलदार गजानन खामकर (उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण), नायब तहसीलदार (संजय गांधी योजना, रत्नागिरी) अनंत चव्हाण, दीपक कुळ्ये (उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर) यांचा सामावेश होता. त्याचप्रमाणे शेखर पारेख (मंडणगड), उजेर शेख (दापोली), लक्ष्मण कोळी (खेड), श्रीमती रोहिणी वारे (गुहागर), यशवंत वनगे (चिपळूण), श्रीमती प्रिया शिंदे (संगमेश्वर), श्रीमती क्रांती खेडेकर (रत्नागिरी), श्रीमती वैदेही गुरव (लांजा), शरद ठाकूर (राजापूर) या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच फिनोलेक्स कॉलेजचे नोडल ऑफिसर श्री. चव्हाण, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर श्री. पाटील आणि नवनिर्माण महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर प्रा. सुशील साळवी यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली. कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपणाने झाली. सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे यांनी केले. प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी आभार मानले.

चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांचा विशेष सत्कार

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असतात. याची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मारुती बोरकर यांनी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष सत्कार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 25-01-2025