रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था आणि रत्नागिरी विशेष कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कैदी बांधवांचे समाजामध्ये पुनर्वसन करण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यात त्यांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यात आले.
भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय व गांडुळ खतनिर्मिती, अळंबी लागवड, अगरबत्ती व धूप बनवणे, बांबूपासून विविध शोभिवंत वस्तू बनवणे अशा विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात ८१ कैदी बांधवांनी सहभाग घेतला आणि प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. विषय तज्ज्ञ म्हणून डॉ. महेश महाले, डॉ. सुकाळे, घवाळी, मिलिंद दातार, नरेश हिरापुरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
व्यावसायिक व बँकेच्या विविध योजना प्रकल्प अहवाल, विपणन, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांचे मार्गदर्शन संस्थेचे संचालक दर्शन कानसे, प्रशिक्षक प्रसाद कांबळे यांनी केले. कैदी बांधवांनी त्यांच्या शिक्षेचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, भांडवलाच्या पूर्ततेसाठी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपआंचलिक प्रबंधक अंजनीकुमार सिंह आझाद यांनी केले. जिल्हा कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनीही मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 28-01-2025













