रत्नागिरी : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेमध्ये अनेक प्रयत्नांनंतरही अद्याप सुधारणा झाली नसल्याचे ‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’ने केलेल्या ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन’ (असर) सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात मात्र शैक्षणिक दर्जा हा उंचावलेला आहे. गणितामध्ये राज्यात तिसरा तर वाचनामध्ये चौथा क्रमांक आला आहे.
असरचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. यानुसार सुमारे २५ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचे मराठी वाचता आले नाही तर ६४ टक्के विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येला एका अंकी संख्येने भागता आले नाही. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या भाषिक आणि गणिती कौशल्यांची पाहणी ‘असर’ सर्वेक्षणात करण्यात आली आहे.
वयानुसार आवश्यक वाचन कौशल्ये आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण म्हणजेच दुसरीच्या दर्जाचे वाचता येणाऱ्या दुसरीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ १७.५ टक्के आहे.
दुसरीच्या स्तराचा मराठीतील परिच्छेद वाचता आला नाही. आठवीतील ६.३ टक्के विद्यार्थ्यांना केवळ सोपे शब्द वाचता आले, मात्र सोपी वाक्ये वाचता आली नाहीत. ३.६ टक्के विद्यार्थ्यांना अक्षरे ओळखता आली पण शब्द वाचता आले नाहीत तर १.७ टक्के विद्यार्थ्यांना अक्षर ओळखही नसल्याचे विदारक चित्र यंदा पुन्हा दिसले आहे.
गणिती कौशल्याची स्थिती भाषिक कौशल्यांपेक्षाही भयानक आहे. तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागण्याचे गणित आठवीतील अवघ्या ३६.३ टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आले. भागाकारचे गणित न येणाऱ्या साधारण ६४ टक्के विद्यार्थ्यांपैकी २३.५ टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा करता आली. उर्वरीत विद्यार्थ्यांपैकी १.१ टक्के विद्यार्थ्यांना अंक ओळखही नसल्याचे दिसून आले आहे.
राज्यात मात्र शैक्षणिक दर्जा खालावलेला असला तरी जिल्ह्यात मात्र दर्जा उंचावलेला आहे. गणितामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. ६७.३ टक्के विद्यार्थ्यांना गणिते सोडविता आली. त्याचबरोबर वाचनामध्ये जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. ६६.३ टक्के विद्यार्थ्यांना चांगले लिहीता वाचता येते. जिल्हा परिषदेने शाळा स्मार्ट विविध उपक्रम राबविले आहेत. याचा फायदा जिल्ह्याच्या गुणवत्तेवर झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 30/Jan/2025














