‘त्या’ मुलाची साडेतीन लाखात विक्री; वरवडेतील दाम्पत्याचा शोध सुरू

चिपळूण : कर्नाटक राज्यातील बेळगाव हुक्केरी तालुक्यातील मुले विक्रीचे आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील तिघांना हुक्केरी पोलिसांनी अटक करत त्याच्याकडील मुलाला चिपळूणमधून ताब्यात घेतले आहे. हे मूल तालुक्यातील निवळी येथे व त्यानंतर जयगड येथे वास्तव्यास होते. त्या मुलाची साडेतीन लाखांना विक्री झाल्याचे तपासात पुढे आले आहे. आता या प्रकरणी हुक्केरी पोलिस तसेच कोल्हापूर व बेळगाव पोलिस अधिक तपास करीत असून, स्थानिक पोलिसांकडे मात्र याबाबत काहीच माहिती नाही.

संगीता सोमा हम्मण्णावर ऊर्फ गवळी (वय ४०, रा. माद्याळ, गडहिंग्लज, कोल्हापूर), मोहन बाबाजी तावडे (६४), संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पिरप्पा तळवार (४५, दोघे रा. निवळी, चिपळूण, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. बेळगावात गेल्या महिन्यांत बालिका विक्रीचे एक प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर हुक्केरीतील आणखी एका प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एक महिन्यांत मुलांच्या विक्रीचे तीन प्रकरणे पुढे आली आहेत.

हुक्केरीतील प्रकाराबाबत अर्चना राजू मगदूम (रा. सुल्तानपूर, हुक्केरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू बसवाणी मगदूम यांच्याशी विवाह झाला होता. अर्चना हिचे हे दुसरे लग्न असून तिला पहिल्या पतीपासून एक मूल आहे. राजू मगदूम याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. मात्र, अर्चनाच्या मुलाची तब्येत चांगली राहत नव्हती. त्यामुळे त्याला पोटाचा विकार असून शखचिकित्सा करायला हवी, असे संगीता सोमू हम्मण्णावर ऊर्फ गवळी हिने सांगितले. तसेच अर्चनाच्या मुलाला दवाखान्याला दाखवूया, असे सांगत तिने मुलाला आपल्याकडे घेतले. मोहन बाबाजी तावडे, संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पिराप्पा तळवार यांचे परिचित असलेल्या दांपत्य नंदकुमार सीताराम डोर्लेकर, नंदिनी नंदकुमार डोर्लेकर (रा. वरवडे, रत्नागिरी) यांना मुलाला साडेतीन लाख रुपयांना विक्री केली. विक्री करण्यात आलेल्या मुलाचे पैसै संगीता, मोहन आणि त्याची पत्नी संगीता यांनी वाटून घेतले.

या प्रकरणात संगीता गवळी संगीता तावडे, मोहन तावडे यांन अटक करण्यात आली आहे नंदकुमार डोर्लेकर, नंदिनी नंदकुमार डोर्लेकर (रा. वरवडे, रत्नागिरी महाराष्ट्र) यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 31/Jan/2025