गुहागर : गुहागर तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये ई-कचरा संकलनाचा ठराव केला. आता गुहागर पंचायत समितीच्या मार्गदर्शनाप्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रत्यक्ष ई-कचरा संकलनाबाबत गावांतर्गत नियोजन करीत आहेत. २३ फेब्रुवारीनंतर गाव ई-कचरामुक्त करण्याचा प्रयत्न या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे.
गुहागर तालुक्यात २६ जानेवारीला ई-कचरा संकलन अभियानाला सुरुवात झाली. गुहागर शहरात फेब्रुवारीच्या प्रत्येक रविवारी ई-कचरा संकलनासाठी घंटा गाडी सुरू झाली. ग्रामीण भागात हा ई-कचरा संकलनाबाबत जनजागृती करावी. त्यानंतर प्रत्यक्ष ई-कचरा संकलन सुरू करावे. जनजागृतीसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या विषयाची माहिती सर्वांना द्यावी, अशी सूचना सहायक गटविकास अधिकारी केळस्कर यांनी केली होती. ग्रामसभांमध्ये विषय मांडता यावा म्हणून ई-कचरा संकलनासंदर्भातील संपूर्ण माहिती देणारे परिपत्रक तयार केले होते.
त्याचे वितरण सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची २४ जानेवारीला ऑनलाईन मिटिंग घेऊन शंकांचे निरसन करण्यात आले. या नियोजनाप्रमाणे ग्रामसभेत ज्यावेळी ई-कचरा संकलनाचा विषय मांडला गेला तेव्हा ग्रामस्थांनीच हा विषय उचलून धरला. या विषयाची माहिती घेतल्यानंतर २५ व २६ जानेवारीला झालेल्या १४ ग्रामपंचायतींमध्ये उत्स्फूर्तपणे गावात ई-कचरा संकलन अभियान राबविण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर अन्य ग्रामपंचायतींमध्ये देखील हे अभियान माझी वसुंधरा अंतर्गत यशस्वी करण्याचे ठराव उर्वरित ग्रामपंचायतींनी केले.
वाड्यांतर्गत ई-कचरा संकलनाची केंद्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची फेब्रुवारी महिन्यातील पहिली आढावा सभा ७ फेब्रुवारीला चिखली येथे झाली. या सभेत या अभियानाविषयीचा आढावा घेतला. त्यावेळी ग्रामसेवक संघटनेने देखील हे अभियान ग्रामपातळीवर यशस्वी करण्यासाठी नियोजन करणार असल्याचे सांगितले. यावेळी मयुरेश पाटणकर यांनी १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत गावामधील वाड्यांतर्गत ई-कचरा संकलनाची केंद्रे तयार करावीत. यामध्ये संकलित झालेला कचरा २३ फेब्रुवारीला ग्रामपंचायत स्तरावर एकत्र करावा. २४ व २५ फेब्रुवारीला संपूर्ण तालुक्यातील ई कचरा संकलित केला जाईल, अशी माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 10/Feb/2025














