राजापूर : खरवतेमध्ये १९८ पुरातन वृक्षांचे जिओ टॅगिंग

राजापूर : शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने नुकतीच गावात विविध प्रजातीच्या झाडांची गणना केली. त्यामध्ये सुमारे सव्वालाख वृक्षांची नोंद झाली असून त्यापैकी विविध स्थानिक १९८ प्रकारच्या पुरातन वृक्षांचे जिओ टॅगिंगही करण्यात आले आहे. वृक्षगणनेत आढळलेले पुरातन अन् औषधी वृक्ष तोडता त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा एकमुखी ठरावही खरवते ग्रामसभेमध्ये पारीत करण्यात आला, त्यामुळे ८० ते १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन होणार आहे.

खरवते गावातील विविध प्रजातींच्या झाडांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वेक्षण करून त्यांची तशी नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी नेहा कुडाळी यांनी दिली. पहिल्या टप्प्यात स्थानिक १९८ प्रकारच्या पुरातन वृक्षांचे जिओ टॅगिंग आणि नंबरीग करण्यात आले. पुरातन वृक्षांच्या बुंध्याची मेजरटेपने मोजण्यात आलेल्या घेरीमध्ये सुमारे सात मीटर गोलाईचे अनेक पुरातन वृक्ष आढळून आले. वृक्षगणनेचा सविस्तर अहवाल नुकताच ग्रामसभेमध्ये प्रसिद्ध केला. पुरातन वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या खरवते ग्रामपंचायतीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

खरवते गावामध्ये राबवण्यात आलेल्या वृक्षगणना उपक्रमांमध्ये सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, पर्यावरणदूत भास्कर गुरसाळे, दयानंद चौगुले, पोलिसपाटील सानिका गोरे, देवीदास उबाळे, संजय माटल, भक्ती माटल, चैत्रा गुरव यांच्यासह ग्रामस्थांनी महत्वाची भूमिका बजावली.

वृक्षगणनेमध्ये झाडांची झालेली नोंद
आंबा (कलम): २५ हजार झाडे, काजू ४० हजार झाडे, कोकम २ हजार, नारळ १ हजार ५०० झाडे, सागवान १३ हजार ७३०, सुपारी ९३०, बांबू ४ हजार ७२९, फणस २ हजार ७२५, किंजळ ७ हजार ९५६, जांभूळ २ हजार ८१२, आंबा (गावठी) ६ हजार ६३४, आईन ६ हजार ८२४ झाडे, भेळा १ हजार ४७३, इतर जंगली झाडे त्यामध्ये वड, पिंपळ, चिंच, आवळा आदी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 10/Feb/2025