..तर १५ फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही; अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

खेड : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत खेड तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी केले आहे.

लाभाध्यांना ई-केवायसी करण्याकरिता गावोगावी कॅम्प आयोजित केले आहे, याकरिता शिधापत्रिकेतील अर्थात, कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधारकार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे. ही प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसी करावी, ई-केवायसी केली नाही तर १५ फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे सोनवणे यांनी कळवले आहे.

१५ फेब्रुवारीपूर्वी १०० टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच रास्तभाव धान्य दुकानदारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेस अन्नंदिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्यवाटप सुरू करावे. आपल्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

धान्यवाटप पूर्ण करा
कोणत्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या १५ तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्यवाटप पूर्ण करावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच वन नेशन वन रेशनकार्ड अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानामध्ये जाऊन अन्नधान्याची उचल करत आहेत, त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानामध्ये ई-केवायसी करून घ्यावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 11/Feb/2025