राजापुरात भात विक्रीतून २१ लाखांची उलाढाल

राजापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजापूर खरेदी-विक्री संघाकडे ९१८ क्विंटल भातविक्री केली आहे. या भात खरेदी-विक्रीच्या माध्यमातून यावर्षी २१ लाख १२ हजार ३२० रुपयांची उलाढाल झाली आहे.

यावर्षों आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ, त्यामध्ये आलेला नद्यांना पूर यामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून गेले. त्यातून उरल्यासुरल्या पिकाची कापणी होऊन हाती आलेल्या भाताची विक्री होऊन मिळालेल्या आर्थिक उत्पनाने शेतकऱ्यांना दिलासा दिला.

तालुक्यामध्ये राजापूर खरेदी-विक्री संघातर्फे चेअरमन चंद्रकांत जड्यार, व्हाईस चेअरमन सूर्यकांत सिनकर आणि संचालक मंडळ, व्यवस्थापक दीपक कानविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचल आणि राजापूर येथे भातखरेदी केंद्र सुरू केली आहेत. पाचल आणि राजापूर येथील केंद्रावर भातखरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये आजपर्यंत राजापूर येथे २० शेतकऱ्यांकडून ५५०.४० क्विंटल, तर पाचल येथे ११ शेतकऱ्यांकडून ३६८ क्विंटल, असे मिळून ९१८.४० क्विंटल भात खरेदी करण्यात आल्याची माहिती राजापूर तालुका खरेदी-विक्री संघाने दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:42 PM 13/Feb/2025