राजापूर : माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत वृक्ष संवर्धनाचा संकल्प करत इतिहासाचे साक्षीदार असलेले गावातील ऐंशी ते शंभर वर्षापूर्वीचे पुरातन व औषधी वृक्ष न तोडण्याचा एकमुखी निर्णय खरवते ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्याबाबतचा ठराव सदस्यांनी ग्रामपंचायतीत केला आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावातील या पुरातन व ऐतिहासिक आणि औषधी झाडांचे संवर्धन होईल,
अशी ग्रामपंचायतीची अपेक्षा आहे.
माझी वसुंधरा ५.० अंतर्गत ग्रामपंचायत खरवतेने शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी यांनी वृक्षगणना अहवाल प्रसिद्ध केला. माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत ११ जानेवारी रोजी ग्रामपंचायत खरवते यांनी ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे वृक्षगणना कार्यक्रम आयोजित केला होता. वृक्षगणनेच्या वेळी जंगलातून फिरताना मोठमोठी इतिहासाची साक्षीदार असलेली विविध प्रकारची पुरातन झाडे पाहून खरवते गावाची एक नव्याने ओळख पुढे आली.
हे पुरातन वृक्ष जंगले आणि पाणवठे हीच या गावाची संपत्ती आहे. यावर सदस्यांचे एकमत झाले म्हणून झाडे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, असे म्हणत गावातील हे शिल्लक असलेले पुरातन वृक्ष वाचविण्यासाठी आता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. असा निश्चय करून ग्रामस्थांनी ग्रामसभेत पुरातन वृक्षांचे संवर्धन करून ते न तोडण्याचा एक ठराव घेतला आहे.
वृक्षगणनेत १९८ पुरातन वृक्ष
पहिल्या टप्प्यातील वृक्षगणनेत विविध स्थानिक १९८ प्रकारचे पुरातन वृक्ष आढळून आल्याचे नमूद करण्यात आले. पुरातन वृक्षांच्या बुंध्यांची मेजर टेपने घेरी मोजण्यात आली. यावेळी साधारण सात मीटर गोलाईचे पुरातन वृक्ष देखील सापडले. तसेच अनेक औषधी वृक्षदेखील दृष्टिक्षेपात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 13/Feb/2025














