चिपळूणमध्ये बंद घर फोडून पावणेसहा लाखांची घरफोडी; मोलकरणीसह तिच्या साथीदाराला बेड्या

कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; चिपळूण पोलिसांची तात्काळ कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळमंडी येथे एक धक्कादायक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. घर मालक बाहेर गेल्याचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे ५ लाख ८८ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या घरात विश्वासू म्हणून काम केले, त्याच घरावर डल्ला मारणाऱ्या मोलकरणीसह तिच्या साथीदाराला चिपळूण पोलिसांनी निष्पन्न करत गुन्हा दाखल केला आहे.

घराचे कुलूप तोडून कपाटातील ऐवज केला गायब

चिपळूण तालुक्यातील कळमंडी, हनुमानवाडी येथील रहिवासी आणि हॉटेल व्यावसायिक सुयोग संतोष बेलवलकर (वय ३० वर्षे) हे ३१ जुलै २०२६ च्या सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते. ३१ जुलै सकाळी ५:०० ते १ ऑगस्ट सायंकाळी ७:०४ वाजेच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली.

सुमारे पावणेसहा लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला

या घरफोडीत एकूण ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने:

  • २ लाख ७० हजार रुपयांचे ४.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र
  • ३६ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे कडी जोड (६ ग्रॅम)
  • ३० हजार रुपयांचे कानातील सोन्याचे कुडी जोड (५ ग्रॅम)
  • ६० हजार रुपयांची सोन्याची तेंडुलकर साखळी (१० ग्रॅम)
  • २४ हजार रुपयांचे सोन्याचे स्वामी पेंडंट (४ ग्रॅम)
  • प्रत्येकी २४ हजार रुपयांचे सोन्याचे दोन ब्रेसलेट (प्रत्येकी ४ ग्रॅम)
  • १८ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे टॉप्स (३ ग्रॅम)
  • ३० हजार रुपयांचे कानातील सोन्याचे कुडी (५ ग्रॅम)
  • ६ हजार रुपयांची सोन्याची नथ (१ ग्रॅम)
  • १२ हजार रुपयांच्या २ सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी १ ग्रॅम)
  • १२ हजार रुपयांचे २ सोन्याचे कॉईन (प्रत्येकी १ ग्रॅम)
  • १२ हजार रुपयांचे २ सोन्याचे पेंडंट (प्रत्येकी १ ग्रॅम)
  • ६ हजार रुपयांचा सोन्याचा गोल मणी आणि ६ हजार रुपयांचा पेंडंट
  • १८,६०० रुपये रोख रक्कम

मोलकरणीनेच रचला घरफोडीचा बनाव

घरमालक सुयोग बेलवलकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान फिर्यादी यांच्या घरात काम करणारी मोलकरीण सौ. दिपीका दिलीप बोबले (वय ४० वर्षे, रा. आवेरीवाडी कळमंडी, ता. चिपळूण) आणि तिचा साथीदार गणेश काशिराम गोरीवले (वय ३१ वर्षे, रा. कळमंडी, ता. चिपळूण) या दोघांनीच मिळून हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले.

चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) आणि ३(५) अन्वये गु.र.नं. २२४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.