आरडी व कागदपत्रांच्या कामाचे आमिष दाखवून अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस
Khed Crime News अंतर्गत अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून समोर आली आहे. पोस्ट ऑफिसमधील कामाच्या निमित्ताने एका कुटुंबाचा विश्वास संपादन करून, ५६ वर्षीय आरोपी पोस्टमन नरेश बाबाजी मोरे याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, खेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. तिचे वडील कामानिमित्त बाहेरगावी राहत असल्याने आरोपीचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. पोस्टाच्या आरडीच्या पावत्या लिहिणे, हप्ते भरणे तसेच ओळखपत्र आणि अन्य शासकीय कागदपत्रांच्या कामात मुलीची मदत लागेल, असे सांगून आरोपीने पालकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीला अनेकदा स्वतःच्या घरी बोलावून घेतले.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, एप्रिल २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत मुलगी आरोपीच्या घरी लिखाणाच्या कामासाठी गेली असता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले. जून २०२५ आणि मे २०२६ मध्येही गावात वास्तव्यास असताना आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी आरोपीने दिल्यामुळे पीडित मुलगी भीतीपोटी मौन बाळगून होती.
मुलीच्या शारीरिक व वागण्यातील बदलावामुळे आईला संशय आला. २८ जुलै रोजी वैद्यकीय तपासणी (प्रेग्नन्सी टेस्ट) केली असता मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आईने विश्वासात घेऊन चौकशी केली असता मुलीने आरोपी नरेश मोरे याच्याकडून झालेल्या अत्याचाराची आपबीती सांगितली.
घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून खेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलीस आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 03-08-2026














